प्रतिनियुक्तीचे भिजत घोंगडे कायम
By Admin | Updated: April 30, 2015 01:44 IST2015-04-30T01:44:29+5:302015-04-30T01:44:29+5:30
मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार; गोरगरीब रुग्णांचे हाल.

प्रतिनियुक्तीचे भिजत घोंगडे कायम
मंगरुळपीर (जि. वाशिम) : तालुक्यातील गोरगरीब जनतेचे आरोग्यपूर्ण जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून रुग्णालयाची भव्य इमारत उभारली, मात्र अनेक वर्षांपासून या रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या उद्देशाला तडे जात असल्याचे दिसून येत आहे. जनतेचे आरोग्य सुस्थितीत राहावे, यासाठी शासन विविध योजना राबविते; मात्र या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. मागील काळात या ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी होते. त्यामुळे सर्व जनतेचे आरोग्य अबाधीत होते; परंतु कालांतराने या रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय मिळत नसल्याने गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचारापासून वंचित राहावे लागत आहे. गोरगरिबांना खाजगी दवाखान्यातील खर्च परवडत नसल्यामुळे शासनाने रुग्णालयाची निर्मिती करून हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले; मात्र या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा पूर्णत: खेळखंडोबा झाला आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध तर नाहीच, याशिवाय या ठिकाणी सोनोग्राफी मशीन ,एक्स रे, बेबी केअर युनिट, रसोई घर आदि यंत्रणा बंद असल्याने ग्रामीण रुग्णालयातील इमारत शोभेची वास्तू झाली आहे.