२४ गावांत लम्पीचा शिरकाव; १२६ जनावरांना संसर्ग
By संतोष वानखडे | Updated: September 21, 2022 16:29 IST2022-09-21T16:28:31+5:302022-09-21T16:29:04+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्वनिधीतून गुरांचे लसीकरण करीत असून जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ८२८ तर पशुसंवर्धन विभागाने २६ हजार ३७९ गुरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली.

२४ गावांत लम्पीचा शिरकाव; १२६ जनावरांना संसर्ग
वाशिम : जिल्ह्यातही जनावरांवरील ‘लम्पी’ची व्याप्ती वाढत असून, आतापर्यंत २४ गावांतील १२६ जनावरांना संसर्ग झाल्याने पशुपालकांची चिंता वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार २०७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून ५१ जनावरे औषधोपचारातून बरे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्वनिधीतून गुरांचे लसीकरण करीत असून जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ८२८ तर पशुसंवर्धन विभागाने २६ हजार ३७९ गुरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली.
लम्पीमुळे जिल्हयातील २४ गावातील १२६ गुरे बाधित असल्याचे आढळून आल्याने या गावांच्या ५ किलोमीटर परिघातील ११९ गावातील २८ हजार २०७ गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी तातडीने याबाबत बैठक घेऊन तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले.
त्यामुळे जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन आजपर्यंत ९१ हजारांपेक्षा जास्त गुरांचे लसीकरण करण्यात आले. गुरांना लम्पीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यासाठी ५३ हजार ९३५ लस उपलब्ध झाली आहे. बाधित क्षेत्रातील ३९ हजार ८१३ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
लम्पी झालेल्या जनावरांचे दूध हे पिण्यासाठी सुरक्षित असून माणसाला त्यापासून कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे नागरिकांना दुधामुळे लम्पी हा रोग होणार नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. विनोद वानखडे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी