वाशिममध्ये अतिक्रमणाचा ‘लोचा’
By Admin | Updated: August 5, 2014 23:18 IST2014-08-05T23:18:12+5:302014-08-05T23:18:12+5:30
शहरातील प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण गुलदस्त्यात आहे.

वाशिममध्ये अतिक्रमणाचा ‘लोचा’
वाशिम : शहरातील प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण गुलदस्त्यात आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी सर्र्वांगीन प्रयत्न होणे गरजेचे ठरत आहे. अनेक चौकांना अतिक्रमणाच्या विळख्याने घेरले आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी तसेच फुटपाथवर लहान मोठी दुकाने थाटली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. एकीकडे अतिक्रमण वाढले आहे तर दुसरीकडे अतिक्रमण काढण्यासाठी सर्वच विभागांमध्ये समन्वय नसल्याचा फटका वाहतुकधारक व शहरवासियांना बसत आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी फोडणे अवघड होऊन बसत आहे.
जिल्हय़ाचे प्रमुख केंद्र असलेल्या वाशिम शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न निकाली निघणे अपेक्षीत आहे. जिल्ह्याची मोठी बाजारपेठ म्हणून शहराकडे पाहिले जाते. जिल्हा निर्मितीनंतर शहराच्या रचनेत आणि विकासात्मक बाबींमध्ये सुधारणा होणे अपेक्षीत आहे. शहराचा विकास होत असला तरी गती मात्र फारच कमी असल्याने शहर सौंदर्यीकरण हे एक स्वप्नच ठरत आहे. सुरूवातीपासून प्रत्येकाने विकासात्मक कामांमध्ये आपापले योगदान दिले असते तर आज शहराचे चित्र पालटले असते. मात्र, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रकारातून शहर विकासाचे तीनतेरा वाजविले गेले. शहरातील लोकसंख्यावाढीबरोबरच वाहनांची संख्याही वाढली. शिवाय व्यावसायिक प्रतिष्ठाने, लहान मोठे व्यवसाय करणारे, हातगाडीवाले, फळविक्रेते आदींची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजिकच शहरात सर्वत्र अतिक्रमण वाढले. दुकानदारांच्या दुकानासमोर रस्त्यावर वाहनांची रांग उभी राहत असून शहराच्या प्रत्येक चौकात ऑटो उभे राहत आहे. याचा विपरित परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत असल्याचे दिसून येत आहे.