गाव कृती आराखड्यावर पथकाची करडी नजर!
By Admin | Updated: July 20, 2016 02:06 IST2016-07-20T02:06:55+5:302016-07-20T02:06:55+5:30
तालुकानिहाय पथके गठित : ४९१ ग्रामपंचायतींसाठी कोट्यवधींचा निधी.

गाव कृती आराखड्यावर पथकाची करडी नजर!
वाशिम: 'आमचं गाव-आमचा विकास' या उपक्रमांतर्गत शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे धोरण अमलात आणले आहे. या निधीतून गावाचा विकास साधण्यासाठी गाव कृती आराखडे तयार केले जात आहेत. या दरम्यान कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेमार्फत तालुकानिहाय भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. ४९१ ग्रामपंचायतींसाठी जवळपास १४७ कोटी रुपयांच्या वर निधी मिळणार आहे.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाखो रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून गावात कोणकोणती कामे करता येईल, याचा आराखडा ग्रामपंचायतींना गावकर्यांच्या सहकार्यातून व विश्वासातून तयार करावा लागणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्हय़ात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तीन दिवसीय कार्यशाळा, प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेले आहेत. ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ातील ४९१ ग्रामपंचायतींनी कार्यशाळा, प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. काही ठिकाणी कार्यशाळा, प्रशिक्षणाला कर्मचारी विलंबाने हजर राहतात, कधी-कधी ग्रामसेवकांसह अन्य कर्मचारी हजरच नसतात, आदी प्रकारच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी भरारी पथकांचे गठण केले असून, कामचुकार व दांडीबाज कर्मचार्यांवर ह्यऑन दी स्पॉटह्ण कारवाई करण्याचे अधिकार या पथक प्रमुखाला दिले आहेत. आतापर्यंत २२५ च्या आसपास ग्रामपंचायतींमध्ये तीन दिवसीय कार्यशाळा झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे ही प्रशिक्षणे होत नसल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यास ह्यऑन दि स्पॉटह्ण कारवाई केली जाणार आहे, असे सीईओ गणेश पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.