Lockdown in Washim : वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 10:35 AM2021-05-08T10:35:07+5:302021-05-08T10:35:16+5:30

Lockdown in Washim : दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहे.

Lockdown in Washim: Complete lockdown in Washim district from Monday | Lockdown in Washim : वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन

Lockdown in Washim : वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ९ मे रोजीच्या दुपारी १२ वाजेपासून ते १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहणर आहे. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी ७ मे रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगर परिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गट विकास अधिकारी यांच्या स्तरावरून होणार आहे. दूध संकलन व घरपोच दूध वितरण सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत करता येईल.
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.
ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील. स्थानिक दुकानदार, हॉटेलामार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था करतील. या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरू ठेवता येईल. नागरिकांनी औषधी खरेदीसाठी बाहेर पडताना प्रिस्क्रिप्शनसोबत बाळगणे आवश्यक आहे. चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि, शेतक-यांना आवश्यक त्या वस्तूचा पुरवठा घरापर्यंत, तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील. या प्रक्रियेचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची राहणार आहे.

भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद
सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरू राहील. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद हे याबाबतचे संनियंत्रण करतील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, बँड पथक यांना परवानगी राहणार नाही.


परवानगी दिलेल्या बाबींसाठीच पेट्रोल वितरण !
सर्व पेट्रोलपंपांवर परवानगी दिलेल्या बाबींसाठीच पेट्रोल वितरित करण्यात यावे. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल, डिझेल यांची उपलब्धता करून देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. गॅस एजन्सीज मार्फत गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण करण्यात यावे. परंतु, ग्राहकांनी गॅस एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलिंडर घेण्यास प्रतिबंध राहणार आहे. गॅस एजन्सीमध्ये ग्राहक आढळून आल्यास संबंधित एजन्सी कारवाईस पात्र राहील. याबाबतच्या पयार्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहणार आहे.


शासकीय कार्यालये बंद, अभ्यांगतांना प्रवेश नाही
सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडित सर्व कार्यालये यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना ऑनलाईन कामकाज करता येईल. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील जसे की महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, नगरपालिका आदी. शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत. अतिआवश्यक कामांसाठी ८३७९९२९४१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अत्यावश्यक कामासाठी बँका, पोस्ट सुरू! 
सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरविण्याचे आदेश आहेत. सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ इन-सिटू (कल्ल-२्र३४) कामकाज सुरू राहील. याबाबतची जबाबदारी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापन यांच्यावर असेल.

Web Title: Lockdown in Washim: Complete lockdown in Washim district from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम