वाशिम जिल्ह्यातील पशुधन संकटात !
By Admin | Updated: December 9, 2014 00:58 IST2014-12-09T00:58:49+5:302014-12-09T00:58:49+5:30
चारा व पाणीटंचाईचा फटका : पशुधन विक्रीसाठी गुरांच्या बाजारात गर्दी, जनावरांची मातीमोल भावात विक्री.

वाशिम जिल्ह्यातील पशुधन संकटात !
वाशिम : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पशुपालक शेतकरीही चिंतेच्या गर्तेत सापडले असून, संभाव्य चारा व पाणीटंचाई लक्षात घेता पशुपालकांनी जनावरे विक्रीला काढल्याने आठवडी बाजारात गुरांची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बाजारात विक्रीस आणलेल्या जनावरांनाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने पशुपालकांना ते मातीमोल भावात विकण्याची पाळी येत आहे.
वाशिम येथील बाजारात मराठवाड्यातील पशुपालकही मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीस आणत असल्याचे चित्र आहे. जनावरांना पाणी व चारा कोठून द्यावा, असा प्रश्न पशुपालकांकडे निर्माण झाल्याने चक्क जनावरे विक्रीस काढल्याने जिल्हय़ातील पशुधन धोक्यात आले असल्याचे चित्र आहे.
बाजारात खरेदीदार कमी व विक्रेतेच जास्त असल्याने शेतीयोग्य बैलही कत्तलखान्यावर जात असल्याचे विदारक चित्र जिल्हय़ातील आठवडी बैल बाजारात दिसत आहे.
वाशिम जिल्हय़ामध्ये वाशिम, रिसोड, मालेगाव, शेलूबाजार, मालेगाव, कारंजा येथे गुरांचे मोठे आठवडी बाजार आहेत; मात्र आजघडीला या बाजारात खरेदीदार कमी व विक्रेते जास्त असल्यामुळे बळीराजाची येथेही घुसमटच होत आहे;
मात्र लोकांची देणी, येणारा भीषण काळ याचा विचार करून १ लाखापर्यंतची बैलजोडी ६0 ते ७0 हजार, ६0 हजार रुपयापर्यंतची बैलजोडी ३0 ते ३५ हजार रु. पर्यंत, ४0 हजार रु. पर्यंतची बैलजोडी १५ ते २५ हजार रु. पर्यंतची विकली जात असल्याचे बाजारात दिसून येत आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणात शेतीयोग्य बैलही कत्तलखान्यासाठी ट्रकच्या ट्रक भरून जात असल्यचे विदारक चित्र बळीराजाच्या डोळय़ादेखत घडत आहे.