पाण्यात बुडणार्या दोन चिमुकल्यांना जीवदान
By Admin | Updated: September 4, 2014 00:25 IST2014-09-04T00:20:50+5:302014-09-04T00:25:25+5:30
रिसोड येथील युवकाने वाचविले खड्डय़ात बुडणार्या दोन चिमुकल्यांचे प्राण.

पाण्यात बुडणार्या दोन चिमुकल्यांना जीवदान
रिसोड : स्थानिक महानंदा कॉलनीत पाण्याने भरलेल्या खड्डय़ात बुडणार्या दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविण्याची कामगिरी येथील अँड. संतोष जाधव यांनी केली आहे. महानंदा कॉलनीत मंगळवार २ सप्टेंबर रोजी २ वर्षांचा पार्थ परमेश्वर देशमुख आणि ३ वर्षांची भक्ती दिलीप देशमुख हे दोन चिमुकले परिसरातील खुल्या जागेत खेळत होती. त्या ठिकाणी चार फुट खोल आणि पाण्याने पूर्णपणे भरलेला खड्डा होता. खेळता खेळता ही मुले त्या खड्डय़ाजवळ गेली आणि तोल जाऊन पाण्यात पडली. खड्डय़ात मुले पडल्याचे बाजुलाच असलेल्या महानंदा गणेश मंडळ सदस्यांच्या नजरेस पडले. त्यांनी मुलांना वाचविण्यासाठी खड्डय़ाकडे धाव घेतली. त्यावेळी जवळच उभे असीलेले अँड. संतोष जाधव यांनी चटकन खड्डय़ात उडी घेऊन दोन्ही चिमुकल्यांना बाहेर काढले. यासाठी त्यांना एकनाथ कुं दे, डॉ. पवन पांडव, ऋषीकेष माळेकर यांनी सहकार्य केले. या खड्डय़ामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, हा खड्डा त्वरीत बुजविण्याची मागणी महानंदा कॉलनीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.