बँकेतील ‘विड्रॉल’वर मर्यादा; ग्राहक त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:04 IST2017-07-18T01:04:26+5:302017-07-18T01:04:26+5:30
मानोरा येथील प्रकार : मर्यादा हटविण्याची मागणी

बँकेतील ‘विड्रॉल’वर मर्यादा; ग्राहक त्रस्त!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : नोटाबंदीनंतर आता पुन्हा मानोरा तालुक्यात रोकडचा तुटवडा जाणवत आहे. बँकेतून केवळ दहा हजार रुपयांचाच विड्रॉल दिला जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. या घटनेला नऊ महिन्याचा कालावधी उलटला; तरीसुध्दा मानोरा येथील स्टेट बँकेने केवळ दहाच हजार रुपयांचा विड्राल मर्यादा लादली आहे. त्यामुळे नागिरकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्टेट बँकेने दहा हजार रुपयांची विड्राल मर्यादा कायमच ठेवल्याने अनेकांना पैशासाठी त्रास होत आहे. सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी खत, बियाणे, तणनाशक फवारणी यासोबतच दर सप्ताहाला मजुरीसाठी पैसे काढावे लागतात; परंतु बँकेने दहा हजार रुपयांची ‘विड्राल’ मर्यादा लादल्याने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
भारतीय स्टेट बँक वगळता इतर बँकामध्ये विड्रालची मर्यादा नाही, तर स्टेट बँकमध्येच का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ५० हजार रुपयांच्या विड्रालसाठी पाच वेळा बँकेत चकरा माराव्या लागतात.
आम्हाला मंगरुळपीरवरुन जेवढा पैसा उपलब्ध होतो; तेवढाच पैसा दिवसभर नागरिकांना पुरवावा लागतो. पैसा कमी येत असल्यामुळे दहा हजार रुपयांची विड्राल मर्यादा ठेवण्यात आली आहे. पुरेसा पैसा उपलब्ध झाल्यास विड्रालची मर्यादा वाढवली जाईल.
- टी.एन. धार्मिक, शाखाधिकारी मानोरा
इतर बँकांप्रमाणे स्टेट बँके नेसुद्धा विड्राल मर्यादा वाढवायला हवी होती. या संदर्भात बँकेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावर तोडगा निघाला नाही, तर शिवसेना स्टाइलने आंदोलन उभारु.
- रवी पवार, तालुकाप्रमुख, शिवसेना