गणरायांना आज निरोप
By Admin | Updated: September 7, 2014 23:02 IST2014-09-07T23:02:40+5:302014-09-07T23:02:40+5:30
कायदा-सुव्यवस्थेसाठी वाशिम येथे १३७0 पोलिस तैनात : तीन टप्प्यात विसर्जन.

गणरायांना आज निरोप
वाशिम : २९ ऑगस्टपासून जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या गणरायांना ८ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. ८ ते १0 सप्टेंबर असे तीन दिवस टप्प्याटप्याने जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ७ सप्टेंबर रोजी दिली. जिल्ह्यात शहर विभागात २१९ तर ग्रामीण विभागात ३८६ असे एकूण ६0५ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे. ग्रामीण भागात १९१ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात आला आहे.गणेश विसर्जनाच्या ितसर्या टप्प्यामध्ये जिल्हय़ात ८ सप्टेंबर ते १0 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन होणार आहे. ८ सप्टेंबर रोजी वाशिम, कारंजा, रिसोड, शिरपूर, धनज बु. जउळका, आसेगाव या ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे. ९ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा तर १0 सप्टेंबर रोजी अनसिंग, धनज पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या कामरगाव येथे श्रींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. तर दुसरीकडे गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेशभक्तही सज्ज आहेत. पालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे बुजवित आहे. मात्र, पावसामुळे सर्वत्र चिखल झाल्याने गैरसोय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
** सदबुद्धी दे !
वाशिमनगरी तशी शांत व संयमी म्हणून परिचित आहे. फार मोठा ऐतिहासिक वारसाही या नगरीला लाभलेला आहे. परंतु, काही विघ्नसंतोषी अपप्रवृत्तींनी या नगरीच्या भाळी २00६ मध्ये अतिसंवदेनशिलतेचा कलंक लावला होता. या नगरीत सर्वधर्मीय लोक वर्षभर गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांचे सण, उत्सव, सत्कार आदींमध्ये हिरीरीने सहभागी होतात. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान बोटावर मोजण्याइतपत काही विघ्नसंतोषी शांतता व सुव्यवस्था बाधित करण्यासाठी क्षुल्लक कारण समोर करून या जातीय सलोख्यामध्ये विस्तवाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करतात. ही भांडणे दोन धर्मात नसून दोन प्रवृत्तींमध्ये असतात. परंतु क्षणातच याला दोन धर्मांचा रंग चढविला जातो. जेव्हा युवकांवर खटले दाखल होतात; तेव्हा मात्र स्वयंघोषित नेते आपसूकच भूमिगत होतात. यामध्ये सर्व सामान्य जनता मात्र होरपळली जाते. हा इतिहास तमाम शहरवासीयांना चांगल्यप्रकारे माहित आहे. विघ्नसंतोषी कोण व कशासाठी ते ही सर्व कसरत करतात? यातून त्यांना नेमके साध्य काय करायचे असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे वाशिमनगरीतील लहान-थोरांना कळून चुकली आहेत. पोलिस यंत्रणेनेही याबाबीला अनुभवले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित व्हावी व शहरात तणाव निर्माण व्हावा, असे जनतेला कधीच वाटले नाही व यापुढेही वाटणार नाही. परंतु काही बोटावर मोजण्याइतक्या अपप्रवृत्ती कुरापत काढतात. त्यात वेठीस मात्र जनतेला धरले जाते. सन २00६ मध्ये घडलेल्या घटनेतही असाच प्रकार झाला होता. काही मोजक्यांनीच आगीत तेल ओ तण्याचे काम केले होते. यातूनच भडका उडाला. हे सत्य पोलिस दलातील बर्याच अधिकारी-कर्मचार्यांना ठाऊक आहे. अनेकवेळा पोलिस दलातील काही विशिष्ट अधिकारी व कर्मचारी फाजील आत्मविश्वास व आततायीपणाच्या आहारी जा तात. परिणामी, कारण नसताना कायद्याचा बडगा उगारण्यात येतो व हाच प्रकार आग लावून जातो. २00६ चा अपवाद वगळता वाशिम शहरातील गणेश विसर्जन सर्वांच्या सहकार्यातून शांततेत व उत्साही वातावरणात पार पडत आले आहे. याहीवर्षी शांतता व उत्साहाची परंपरा कायम राहो, बाप्पा सर्वांना सद्बुद्धी देवो, हीच अपेक्षा शहरवासी बाळगून आहेत. मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक मानल्या जाणार्या गणरायाचे २९ ऑगस्टला धुमधडाक्यात शहरात आगमन झाले होते. गेल्या ९ दिवसांपासून बाप्पाचा शहरात मुक्काम आहे. शहरी विभागात २१९ तर ग्रामीण भागात ३८६ असे एकूण ६0५ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे. ९ दिवसाच्या दीर्घ मुक्कामानंतर ८ सप्टेंबरला बाप्पांचे विसर्जन होणार आहे. बाप्पांना निरोप देण्यासाठी संपूर्ण वाशिमनगरी सज्ज झाली आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव पोलिस दलाची अतिरिक्त कुमकही पाचारण करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी विसर्जन मार्गावर तात्पुरते दुभाजक तयार करण्यात येत आहेत. गणपती बाप्पांकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे अभिवचन घेत वाशिमवासी बाप्पाला निरोप देणार आहेत.
** अशा केल्या प्रतिबंधात्मक कारवाया
* गणेशोत्सव काळात पोलिस प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. गणेशोत्सव काळात समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होउ नये व गणेशोत्सव शांततेने पार पडावा याकरीता जिल्हय़ात सीआरपीसी कलम १0७ नुसार ४५९ कारवाया केल्या. या प्रमाणे कलम १0९ नुसार २१, ११0 नुसार १0५, १४९ नुसार ४६, १५१ नुसार ४ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ५५/५७ नुसार तडीपार ७, ११0 नुसार ३६, १२२ नुसार ९, १२४ नुसार १, मुंबई दारुबंदी कायद्यानुसार कारवाई १३0, जुगार कायद्यानुसार ५0 अशा प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्यात.
* कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस विभागाने एकूण ५८८ बैठका घेतल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी सुद्धा त्यांच्या विभागात व पोलीस स्टेशन स्तरावर जातीय सलोखा, पोलीस मित्र समिती, शांतता समिती, गणपती मंडळ, डिजे व्यावसायिक, मंडप डेकोरेशन, गणेश मूर्तिकार, व्यापारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष इत्यादींच्या एकूण ५५८ बैठका घेवून सर्वांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहे त, असे पोलीस अधीक्षक पोकळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
** लाखोंची उलाढाल
सोमवार सकाळपासून सुरू होणार्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळाचे युवक ढोलताशासाठी जवळजवळ ५ लाखावर रुपये खर्च करीत ढोलताशाच्या गजरात थिरकत जल्लोषात बाप्पा गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या ढोलताशांचा मिरवणुकीमध्ये ७ हजारापासून तर ४0 हजारापर्यंत खर्च लागत असल्याचे मंडळाचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ढोलताशा सोबतच आखाडा ही मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. शहरामधील गणेशमंडळे जवळजवळ हजारोंचा गुलाल उधळणार असल्याचे कळते.
** बचाव पथके तैनात, दारू विक्री बंद
गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बचाव पथके तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी दिली. तर गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी विसर्जनादरम्यान देशी व विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिले आहेत.
** विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डेच खड्डे
शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावर असलेले खड्डे व चिखल यंदा भक्तांना त्रस्त करण्याची शक्यता बळावली आहे. पालिकेने शहरातील काही भागातील खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली असली तरी त्यामध्ये दगडांची टोळ व मातीमिश्रीत मुरूम टाकला जात असल्याने सर्वत्र चिखल होत आहे. मिरवणूकीचा काही भागही यातून सुटला नाही. भाविकांच्या अडचणी वाढण्याबरोबरच मिरवणुकीत खड्डे व चिखलाचा अडथळा राहण्याची शक्यता आहे.
** असा आहे जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त पोलिस कर्मचारी संख्या पोलिस अधीक्षक - 01 अपर पोलिस अधीक्षक - 01 पोलिस उपअधीक्षक - 06 पोलिस निरीक्षक - 15 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक - 71 कर्मचारी - 940 पुरुष होमगार्ड - 294 महिला होमगार्ड - 42 एसआरपीएफ - 3 प्लाटुन.