विधानसभेच्या आखाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
By Admin | Updated: October 3, 2014 00:36 IST2014-10-03T00:36:48+5:302014-10-03T00:36:48+5:30
रिसोड मतदारसंघातील चित्र.

विधानसभेच्या आखाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
विवेकानंद ठाकरे / रिसोड(वाशिम)
जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या रिसोड मतदारसंघात आगामी १५ ऑक्टोबरला होऊ घातलेली विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मतविभाजनाचा फॅक्टर निकाल प्रभावित करणार असला तरी, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे दिसून येत आहे.
खासदार भावनाताई गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिवंगत सुभाषराव झनक आदी दिग्गजांच्या भोवती आजवर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे. रिसोड मतदारसंघ या तिन्ही दिग्गजांची जन्मभूमी व कर्मभूमी राहिलेला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाला जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच या मतदारसंघातील राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. गत २५ वर्षांपासून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या राजकारणात वावरणार्या भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती तुटल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी इरेस पेटले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबतही नेमकी तशीच परिस्थिती झाली. आघाडीत बिघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्ष परस्परांसमोर उभे ठाकले. निवडणुकीच्या सध्याच्या चित्रानुसार ही निवडणूक अतिशय रंगतदार ठरणार आहे. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक दुसर्यांदा नशीब आजमावत आहे. भाजपच्या अँड. विजयराव जाधव यांनी पाचव्यांदा रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाराव खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून दंड थोपटणार्या शिवसेनेने जिल्हा परिषदेचे सदस्य विश्वनाथ सानप यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे निवडणूक रणसंग्रामामध्ये आहेत व भारिपतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड पहिल्यांदाच निवडणुकीत उभे आहेत. रिसोड विधानसभा निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात असल्यामुळे लढत ही काट्याची ठरणार आहे.