राहायला जाण्यापूर्वीच निवासस्थानांची वाताहात
By Admin | Updated: July 10, 2014 22:42 IST2014-07-10T22:42:01+5:302014-07-10T22:42:01+5:30
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाची निवासस्थाने पडली ओस

राहायला जाण्यापूर्वीच निवासस्थानांची वाताहात
वाशिम: जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांसाठी बांधलेल्या शासकीय निवाससस्थानाची राहायला जाण्यापूर्वीच पुरती ह्यवाटह्ण लागली आहे. निवासस्थानातील खिडक्यांच्या काचा आणि दरवाजेही तुटलेल्या अवस्थेत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येत आहे. कोट्यवधी रुपये खचरून बांधलेली निवासस्थाने ओस राहत असल्याने, निवासस्थाने बांधलीच कशाला? अशा प्रश्न निर्माण होत आहे.
रुग्णांना चांगली सेवा सेवा मिळावी व त्यांच्यावर जलदरित्या उपचार करता यावेत यासाठी शासन जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व उपकरणे टप्प्याटप्याने उपलब्ध करून देत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तळमजल्यावर पहिला मजला चढविण्यात आला. खाटांची संख्या वाढविण्यात आली. याबरोबरच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांसाठी शासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातच निवासस्थानांचे सुध्दा बांधकाम केले. यावर कोट्यवधी रुपये खर्च आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २0१३ मध्ये बांधकाम पूर्ण करून सदर निवासस्थान जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. या इमारतीमध्ये वर्ग एकच्या दोन अधिकार्यांचे निवासस्थान, वर्ग दोनच्या सहा अधिकार्यांचे निवासस्थान, वर्ग तीनच्या चार कर्मचार्यांसाठी व चतृर्थ ङ्म्रेणी कर्मचार्यांसाठी दोन असे एकूण १४ निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. कोटयवधी रुपयांची बांधकाम करुन बांधण्यात आलेल्या १४ निवासस्थापैकी केवळ चतुर्थ ङ्म्रेणीच्या दोन निवासस्थानात कर्मचारी राहायला आले आहेत. तर अन्य १२ निवासस्थाने १ एप्रिल २0१३ पासून धुळखात पडलेली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सदरची निवासस्थाने सुयोग्य स्थितीत हस्तांतरित केल्यानंतरही या ठिकाणी एकही अधिकारी राहायला आले नाही. त्यामुळे या निवासस्थानांची दुरवस्था होवून इमारतीच्या काचेच्या खिडक्या फुटलेल्या आहेत तर दरवाजे तुटून पडलेले आहेत. इमारतीच्या आत मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून परिसराला झुडपे व घाणीचे विळखा घातला आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या निधी पाण्यात गेल्याचे वास्तव आहे.