नझूलच्या भाडेतत्त्वावरील जमिनी भोगवटदार होणार
By Admin | Updated: January 11, 2016 01:43 IST2016-01-11T01:43:37+5:302016-01-11T01:43:37+5:30
विक्री करणे, कर्ज घेण्याचे व्यवहार होणार सुलभ.

नझूलच्या भाडेतत्त्वावरील जमिनी भोगवटदार होणार
डॉ. दिवाकर इंगोले / कारंजा: कारंजा तालुक्यातील नझुल जमीनीचे पट्टे भोगवटदार १ होणार आहे. आता भुखंडाची मालकी मिळाल्याने विक्री करणे, कर्ज घेणे हे व्यवहार सुलभ होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूली विभागातील नागपूर व अमरावती विभागातील निवासी, वाणिज्यीक आणि औद्योगीक प्रयोजनासाठी तत्कालीन मध्य प्रांत आणि बेरार भागात लागू असलेल्या कायद्यान्वये मोठय़ा प्रमाणात नझुल व शासकीय जमीनी भाडेपट्टयावर देण्यात आल्या आहेत. शासकीय व नझुल जमीनीपैकी बहूतांश जमीनी या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पुर्वीच्या आहेत. या जमीनीचे प्रस्ताव त्यावेळी अस्तित्वात असलेल्या अधिनियमातील तरतुदीनुसार देण्यात आले. कारंजा तालुक्यातील विविध जिनींग अँंड प्रेसिंग कंपनी, शैक्षणिक संस्था, गृहनिर्माण संस्था यांना देण्यात आले. या भुखंडाचा ताबा जरी भुधारकाकडे असेल तरीही तो जमिनीचा मालक नाही. त्यामुळे अशा भुखंडाच्या मालकी हक्क देण्याबाबत महाराष्ट्र शासन गांभीर्याने विचार करीत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळांची बैठकही झाली आहे. त्यात अशा जमीनीबाबत अभ्यास करुन शिफारशी करण्याबाबत शासनाने एक समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार नागपूर, अमरावती विभागातील लिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या जमीनीच्या भोगवटदार वर्ग १ म्हणून मालकी हक्क देण्याबाबत ही समिती शिफारशी करणार आहे. संपूर्ण कारंजा शहरातील अनेक जागा या निवासी गृह निर्माण संस्थेस देण्यात आल्यात. त्या भाडेतत्वावर असल्याने गृहनिर्माणासाठी कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. कारंजा शहरातील व शहरालगत प्रचंड अतिक्रमण झाले आहे. त्यात नझुल जमीनी महाराष्ट्र शासनाने ग्राम पंचायतीस महाराष्ट्र निर्मितीनंतर हस्तांतरीत केलेल्या शासकीय जमीनी यावर आता ही समिती शिफारशी देईल. असा मालकी हक्क देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे महसूल उपलब्ध होईल.