शेवटच्या टप्प्यात रंगलेय पाठिंबासत्र !
By Admin | Updated: October 12, 2014 02:04 IST2014-10-12T02:04:37+5:302014-10-12T02:04:37+5:30
वाशिम जिल्ह्यातील राजकारण तापले; उमेदवार निश्चिंत, मतदार संभ्रमात.

शेवटच्या टप्प्यात रंगलेय पाठिंबासत्र !
संतोष वानखडे / वाशिम
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रमुख उमेदवारांना विविध नेत्यांचा पाठिंबा जाहीर करण्याची राजकीय खेळी खेळली जात असल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांची निवडणूक नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. नेते व सामाजिक घटकांच्या पाठिंब्यामुळे उमेदवार थोडे निश्चिंत होत असले तरी दुसरीकडे संभ्रमामुळे मतदार पार गोंधळून जात असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
युती तुटल्याने आणि आघाडी फुटल्याने प्रत्येक पक्ष व उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने काही जणांनी बंड पुकारले, तर काही पक्षांकडे उमेदवारच नसल्याने दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीनही मतदारसंघांमध्ये प्रचाराचा पहिला आणि दुसरा टप्पा फारसा गाजला नाही. मात्र, अनपेक्षित घडामोडीमुळे तिसरा टप्प्यात सुरुवातीपासूनच राजकारणाला नवीन कलाटणी मिळत आहे.यामुळे कोण कुणासोबत आहे, याचे अंदाज बांधणेही अवघड होऊन बसले आहे.
तिसर्या टप्प्यात प्रमुख उमेदवारांना सामाजिक संघटना, नाराज नेतेमंडळी, अपक्ष उमेदवार, जात-पोटजातींच्या समूहांकडून अचानकपणे पाठिंवा जाहीर करण्याची खेळी मोठय़ा प्रमाणात खेळली जात आहे. यामुळे विविध उमेदवारांना पाठिंबा देण्याची मतदारसंघांमध्ये स्पर्धाच लागली आहे की काय, असे वाटण्याजोगे चित्र दिसून येत आहे. या पाठिंब्यांमुळे आपली बाजू भक्कम झाल्याचा दावा उमेदवार करीत आहेत, तर याच पाठिंब्यांच्या अनुषंगाने विविध अफवा पसरवून मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. अफवांच्या बाजारात अचानक आलेल्या तेजीमुळे एका दिवसापूर्वीपर्यंत एका उमेदवारासोबत असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी दुसर्याच दिवशी अन्य उमेदवाराच्या प्रचार रॅलीत दिसत आहेत.
*सोयीचे राजकारण येणार अंगलट !
विधानसभा निवडणुकीला जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच लोकसभा निवडणुकीतील सोयीच्या राजकारणाची किनार लाभत असल्याचे राजकीय वतरुळातील चर्चेवरून समोर येत आहे. जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती व लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांच्या हाती सोयीच्या राजकारणाची किल्ली होती, त्यातील काही पुढारी आता विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषद, नियोजन समिती व लोकसभा निवडणुकीत दुखावलेले पुढारी आता वचपा काढण्याच्या ईष्र्येने निवडणूक प्रचारात उतरले असल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे. सोयीच्या राजकारणाचे पडसाद विशेषत: रिसोड व कारंजा मतदारसंघात जास्त उमटत असल्याच्या चर्चेने निवडणुकीचे चित्र अधिकच धूसर केले आहे.