मंगरुळपीर येथील लक्ष्मी जिनिंग-प्रेसिंगला आग
By Admin | Updated: April 25, 2015 02:20 IST2015-04-25T02:20:43+5:302015-04-25T02:20:43+5:30
लाखो रुपयांचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली, शॉटसर्किटमुळे आग.

मंगरुळपीर येथील लक्ष्मी जिनिंग-प्रेसिंगला आग
मंगरुळपीर (जि. वाशिम) : शहरालगत असलेल्या कारंजा रोडवरील श्री लक्ष्मी कॉटन जिनिंगला २३ एप्रिल रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास शॉटसर्कीटमुळे आग लागल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीच्या या घटनेबाबत मंगरुळपीर येथील श्यामसुंदर बाहेती यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केले की, जिनिंग-प्रेसिंगला २३ एप्रिलच्या रात्रीदरम्यान शॉटसर्कीटमुळे आग लागली असून, या आगीत मशनरी पार्ट इलेक्ट्रीक पॅनल, रुई गठण, कपाशी, सरकी जळून खाक झाली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आग लागताच कारंजा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे आग लवकरच आटोक्यात आणण्यात यश आले. याप्रकरणी तपास पो.कॉ.हे. साखरकर करीत आहे. मंगरुळपीर शहर व तालुक्यात आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाळा असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरत आहे.