लाखो भाविक झाले नतमस्तक!
By Admin | Updated: April 16, 2016 01:48 IST2016-04-16T01:48:31+5:302016-04-16T01:48:31+5:30
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे रामनवमी उत्सव; देशभरातील भाविकांची उपस्थिती.

लाखो भाविक झाले नतमस्तक!
मानोरा (जि. वाशिम): बंजारा समाजाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसह संपूर्ण देशातून आलेले भाविक शुक्रवारी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
शुक्रवारी तापमान ४0 अंशावर असतानाही भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत सेवालाल महाराजांचा जयघोष यावेळी करण्यात आला. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या अडीच किलो सोन्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली तसेच कर्नाटकमधील संत हमुलाल महाराज यांचे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आले आहे. येथे बंजारा समाजातील दोन्ही संतांचे मंदिर बांधल्यामुळे भक्तिधाम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. भक्तिधाम बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे स्वच्छता अभियान कार्यालयाची स्थापना केली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, दिनेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव, डॉ. श्याम जाधव, राजेश निवल आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रणजित पाटील, खा. भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रशासनाची चोख व्यवस्था
यात्रेत दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून भाविक दाखल झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने २00 स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला.