लाखमोलाच्या फटाक्यांची ‘आतषबाजी’
By Admin | Updated: October 27, 2014 00:49 IST2014-10-27T00:49:07+5:302014-10-27T00:49:07+5:30
वाशिम जिल्हावासीयांनी तब्बल १९ लाख रुपयांपेक्षाही अधिक रकमेची आतषबाजी.

लाखमोलाच्या फटाक्यांची ‘आतषबाजी’
वाशिम : दीपावलीच्या प्रकाश पर्वावर जिल्हावासीयांनी तब्बल १९ लाख रुपयांपेक्षाही अधिक रकमेचे फटाके उडविले. फटाक्यांच्या भावात वाढ झाली असताना बालहट्टांसमोर पालकांनी नमते घेत काही प्रमाणात खरेदी केल्याचे यावेळी दिसून आले. फटाक्यांमुळे प्रदूषण होऊन कान बहिरे होणे, आग लागणे, त्वचार विकार यांसह इतर हानी होते. त्यामुळे दिवाळी सणात फटाके फोडू नये, अशी विचारसरणी बाळगणारी एक फळी समाजात निर्माण झाली आहे. परंतु, दिवाळीसोबत फटाक्याचे अतूट नाते जुळले असल्यामुळे फटाके उडविणार्यांची संख्याही मोठी आहे. हे लक्षात घेऊन वाशिम शहरातील परवानाधारक फटाके विक्रेत्यांची तब्बल ५0 पेक्षाही अधिक दुकाने येथील आंबेडकर चौक ते नगरपालिका मार्गावर लागली होती. दिवाळीच्या पृष्ठभूमीवर येथील फटाका व्यावसायिकांनी साधारणत: एक लाखापासून दोन-तीन लाखापर्यंतच्या फटाक्यांचा दुकानात भरणा केला होता. यामध्ये चायना फटाके, सद्दाम बॉम्ब, मिठ्ठू छाप फटाके, टिकली, झाड यासह इतर फटाक्यांचा समावेश होता. येथील फटाका व्यावसायिक अकोला, नागपूर, जळगाव, शिवाकाशी या गावांमधून फटाके बोलावितात. गोडावूनची उपलब्धता नसल्यामुळे एक व्यावसायिक एके दिवशी एक लाखाचाच फटाक्यांचा माल बोलावू शकतो. प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षी ज्या दरात व्यावसायिक ग्राहकास फटाका विकत होता, त्या दरात यावर्षी व्यावसायिकांनी फटाके खरेदी केले. त्यामुळे नाइलाजाने व्यावसायिकांना जादा दरात फटाके विकावे लागले आहे. वाशिम येथून तालुकाभरात फटाके जातात. त्यामुळे अंदाजे १0 लाखांपेक्षा अधिक फटाक्यांची विक्री कारंजा फटाका असोसिएशनकडून करण्यात आली आहे.