आता बँकेतही शेतक-यांच्या सेवेत कोतवाल!
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:01+5:302016-06-07T07:42:01+5:30
खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत कोतवालांची नेमणूक करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

आता बँकेतही शेतक-यांच्या सेवेत कोतवाल!
वाशिम : पीक कर्जप्रकरणी बँकेत शेतकर्यांना येणार्या अडचणींची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे शेतकर्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक बँकेत कोतवालाची नेमणूक करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी खरीप पीक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी अधिकार्यांना संबोधित करताना कोतवालाच्या नावाचा व भ्रमणध्वनी क्रमांकाचा फलक संबंधित बँकेच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सोमवारी ही बैठक घेण्यात आली.
यावेळी आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, वाशिमचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार बळवंत अरखराव, अमोल कुंभार, ए. पी. पाटील, सचिन पाटील, सोनाली मेटकरी, सुरुडकर, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले, की राज्य शासनाने किमान ८0 टक्के शेतकर्यांना खरीप पीक कर्जाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पीक कर्ज पुनर्गठन व रुपांतरण करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यास सर्व बँकांनी प्राधान्य द्यावे. शेतकर्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैसे उपलब्ध होणे आवश्यक असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांना खरीप पीक कर्जाचे वाटप १५ जूनपूर्वी करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. पीक कर्ज मागणीसाठी प्राप्त झालेले अर्ज प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढावेत. तसेच पीक कर्जासंबंधी कागदपत्राबाबत कोणतीही समस्या असल्यास बँकेच्या अधिकार्यांनी तातडीने संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांशी संपर्क साधून खातरजमा करून घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.