वाशिम जिल्ह्यात कारंजाचा कुणाल सोळंके प्रथम
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:43:05+5:30
जिल्ह्याचा निकाल ८८.७२ टक्के, अमरावती विभागात द्वितीय.

वाशिम जिल्ह्यात कारंजाचा कुणाल सोळंके प्रथम
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याने गतवर्षीची टक्केवारी व अमरावती विभागातील क्रमांक यंदाही कायम ठेवण्यात यश मिळविले. जिल्ह्याचा निकाल ८८.७२ टक्के लागला असून, अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८९.0४ टक्के होते. जिल्ह्यात कारंजा येथील कुणाल सोळंके याने ९८.६0 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
जिल्हय़ात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २0 हजार ९८२ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती; त्यापैकी २0 हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, १८ हजार ५७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ८८.७२ एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५१३५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ७९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७९२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर उर्वरित ७00 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.
उत्तीर्ण १८ हजार ५७६ विद्यार्थ्यांमध्ये १0२७६ मुले व ८३00 मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.९४, तर मुलींची टक्केवारी ९१.0२ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. रिसोड तालुक्याचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. रिसोड तालुका ९0.७0, मानोरा तालुका ८९.६४, कारंजा ८९.१८, वाशिम ८८.४२, मंगरुळपीर ८७.६१, मालेगाव ८५.९३ टक्के निकाल लागला आहे.