कहाळे करतात स्वखर्चातून तृष्णातृप्ती
By Admin | Updated: June 10, 2015 02:55 IST2015-06-10T02:55:29+5:302015-06-10T02:55:29+5:30
लोकांचाही सहभाग ; तीन हजार ग्रामस्थांच्या चेह-यावर हास्य.

कहाळे करतात स्वखर्चातून तृष्णातृप्ती
वाशिम : तालुक्यातील ग्राम गोंडेगाव येथे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष व ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता गोंडेगाव येथील समाजसेवक बन्सीलाल कहाळे यांनी स्वखर्चातून शेतातून पाइपलाइनद्वारे गावात पाणी आणले. या पाण्याद्वारे ग्रामस्थ व जनावरांची तहान भागविण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांची गावकर्यांसाठीची तळमळ पाहता त्यांना लोकसहभागही लाभत आहे. वाशिम तालुक्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या गोंडेगावामध्ये तीव्र पाणी टंचाई असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. गावात जवळपास पाणीही नसल्याने दूरवरुन पाणी आणावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता बन्सीलाल कहाळे यांनी गावासाठी काहीतरी करण्यासाठी पुढाकार घेत आपल्या शेतात असलेल्या विहिरीवरुन ८0 पाईप टाकून गावात पाणी आणले. बन्सीलाल यांच्या शेतातील विहिरीला पाणी भरपूर असल्याने व नागरिकांची पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून त्यांनी ही व्यवस्था केली. गावातील जनावरांच्या पिण्यासाठी असलेल्या हौदापर्यंत पाइपलाइन करुन तेथे दररोज दोनवेळा पाणी मोटारपंपाव्दारे सोडण्यात येते. यावेळी पाणी भरण्यासाठी मोठ मोठया रांगा लागतांना दिसून येत आहेत. कहाळे यांनी गावासाठी केलेल्या पाण्याची व्यवस्था पाहून लोकांनीही सहभाग नोंदविला. पाइपलाइनसाठी खोदण्यात येत असलेल्या ख्डयांसाठी त्यांना एक रुपयाही देण्याचे काम पडले नाही. अंबादास रामजी गावंडे यांनी पाइपलाइनसाठी खोदण्यात असलेल्या खड्डयांच्या खर्चाचा भार उचलला. शेतातील विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी लागलेला खर्च कहाळे यांनी एकट्यांनी उचलून गावकर्यांची तहान भागविण्याच्या कार्याचे गावात कौतुक होत आहे.