पाणी तपासणी प्रयोगशाळांतील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:27+5:302021-08-22T04:44:27+5:30
काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून त्या-त्या जिल्ह्याच्या आकारमानानुसार पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून ...

पाणी तपासणी प्रयोगशाळांतील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडून त्या-त्या जिल्ह्याच्या आकारमानानुसार पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्या.
जिल्ह्यात जिल्हास्तरावर एक आणि मालेगाव, मानोरा येथे पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित आहे. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी रसायनी, अनुजैविक तज्ज्ञ, प्रयोगशाळा सहायक, प्रयोगशाळा मदतनीस, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशी पदे मंजूर असून, ती सर्व ११ महिन्यांच्या कराराने कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आलेली आहेत. हे कर्मचारी गेल्या सात ते आठ वर्षांपासून सेवा देत आहेत.
दरम्यान, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाने २६ जुलै २०२१ च्या पत्रानुसार उपसंचालकांना प्रयोगशाळेतील पदे बाह्य स्रोतांद्वारे भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे. काही कर्मचाऱ्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे. अशा स्थितीत बाह्य स्रोतांमार्फत पाणी गुणवत्ता तपासणीची कामे करून घेतल्यास सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांनी काय करायचे, असा सवाल त्यांच्यातून उपस्थित केला जात आहे.
..................
कोट :
पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांमध्ये सध्या ११ महिन्यांच्या करारावर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्याऐवजी आता बाह्य स्रोतांमार्फत पाणी गुणवत्ता तपासणीची कामे करून घेण्याचे वरिष्ठ स्तरावरून निर्देश आहेत.
- सुनील कडू
वरिष्ठ भू-वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाशिम