आलेगावात साडेचार लाखांचा मोह साठा जप्त्र
By Admin | Updated: November 22, 2014 02:11 IST2014-11-22T02:11:27+5:302014-11-22T02:11:27+5:30
ट्रक, बोलेरो व्हॅनसह १७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात : तिघांना अटक.

आलेगावात साडेचार लाखांचा मोह साठा जप्त्र
चान्नी/आलेगाव (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आलेगाव येथे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकून गावठी दारू गाळण्यासाठी उपयोगात येणार्या मोह फुलांचा साडेचार लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी एकूण १७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तीन आरोपींना अटक केली.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आलेगाव येथील निर्गृणा नदीच्या काठावरील वाडकेश्वर मंदिरालगत मोह फुलांचा मोठा साठा उतरविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी एम.पी. 0४ एच.ई. 0१३८ मधून मोह फुलांचे कट्टे एम.एच. ३0 एबी ७२ व एम.एच. ३0 एल ३२३८ क्रमांकाच्या दोन बोलेरो व्हॅनमध्ये भरल्या जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालक पळून गेला. तथापि, अब्दुल माजीद शे. कासम, अब्दुल निसार अब्दुल नबी व शे. वाजीद शे. सलीम तिघेही रा. आलेगाव यांना पोलिसांनी अटक केली.
यावेळी पोलिसांनी ट्रकमधील ११0 क्विंटल मोह फुलांचा साठा (किंमत ४,३८,२४0), ट्रक (किंमत ७ लाख ५0 हजार), दोन बोलेरो व्हॅन (किंमत ५ लाख), मोटारसायकल (२५ हजार), २ मोबाईल (३ हजार), असा एकूण १७ लाख १६ हजार २४0 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तीन आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा ६१ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक जाधव, बापूराव चव्हाण, अनिल राठोड, शेख अन्सार, इरफान अली, संदीप तराळे यांनी ही कारवाई केली.