हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जानगिर महाराज
By Admin | Updated: October 20, 2014 01:07 IST2014-10-20T00:54:48+5:302014-10-20T01:07:04+5:30
राष्ट्रीय एकात्मता दिन विशेष

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जानगिर महाराज
शिखरचंद बागरेचा/ वाशिम
जिल्ह्यात सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहत असून, शिरपूर जैन येथील जानगिर महाराज संस्थान मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सुमारे चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या जानगिर महाराज संस्थानचे शिरपूर जैन या गावामध्ये सिद्धेश्वराचे भव्य असे शिवतीर्थ मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण असलेल्या या ठिकाणी एक सरोवर असून, हिंदू-मुस्लिम जमातीचे राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे असे हे प्रतीक आहे. जानगिर महाराज यांच्या काळात येथे मुस्लिम संत मिर्झा मियाँ अमानुक्काशाह नावाचे एक महान संत होऊन गेले. अमानुक्काशाह व जानगिर महाराज या दोघांचे संबंध फार जिव्हाळ्याचे असे संबंध होते. म्हणूनच याला हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जात असे. शिरपूरनगरी ही जानगिर महाराजांचीही कर्मभूमी होती. जानगीर बाबा यांच्यानंतर त्याची गादी वारसा म्हणून शिवगिर महाराजांनी चालविली. १ जानेवारी १९४२ ला संत शिवगिर महाराजांनी इच्छामरण स्वीकारून जानगिर महाराज संस्थान परिसरात समाधी घेतली. शिवगिर महाराज यांच्यानंतर महान तपस्वी ओंकारगिर महाराज गादीवर बसले. याच परिसरात संत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला कुंड अजूनही विद्यमान आहे. ज्ञानयोगी ओंकारगिर महाराज यांचे ६ ऑगस्ट १९९६ रोजी देहावसान झाले. या ठिकाणी जानगिर महाराज मंदिरासह ओंकारगिर बाबा, शिवगिर बाबा व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. जानगिर महाराज संस्थान येथून संत मिर्झा मियाँ अमानुक्काशाहच्या पवित्र दग्र्यावर नैवैद्य घेऊन जाण्याची परंपरा आजही जोपासली जाते. जोपर्यंत नैवैद्य तेथे जात नाही, तोपर्यंत जानगिर महाराज संस्थानवरील प्रसाद कोणीही सेवन करीत नाही. ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. अशा एकात्मतेचे प्रतीक म्हणून हे संस्थान आहे.