जलयुक्त शिवार अभियानात १५४ गावांचा समावेश !
By Admin | Updated: February 25, 2016 01:50 IST2016-02-25T01:50:55+5:302016-02-25T01:50:55+5:30
जलसंधारणाची कामे प्रस्तावित; लोकाभिमुख चेहरा देण्याचा प्रयत्न.

जलयुक्त शिवार अभियानात १५४ गावांचा समावेश !
संतोष वानखडे / वाशिम
पाणीटंचाईच्या सावटातून टंचाईग्रस्त गावांना बाहेर काढण्यासाठी शासन राबवित असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात २0१६-१७ या वर्षात वाशिम जिल्ह्यातील १५४ गावांचा समावेश झाला आहे.
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना, जलसंधारणाची सुविधा निर्माण करणे, भूजल पातळीत वाढ करणे, पाणी अडवा-पाणी जिरवा आदींचा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्या वर्षी वाशिम जिल्ह्यातील २00 गावांचा समावेश होता. यामध्ये वाशिम २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ व कारंजा ३४ गावांचा समावेश होता. या गावांमधील जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे साहजिकच यावर्षी या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणे अपेक्षित नाही. जलयुक्तमधील अनेक गावांचा समावेश यावर्षी पाणीटंचाई कृती आराखड्यात असल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले. यावर्षी जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. वाशिम २६, रिसोड १८, मालेगाव २५, मानोरा २२, मंगरूळपीर ३१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये बंधारे बांधणे, तलावातील गाळ उपसा करणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे, सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढणे, पाणी अडवा-पाणी जिरवा, ही मोहीम राबविण्यासोबतच विविध कामे केली जाणार आहेत.