शिलाई मशीन व दर कराराचा मुद्दा गाजला
By Admin | Updated: February 6, 2016 02:31 IST2016-02-06T02:31:47+5:302016-02-06T02:31:47+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज अपूर्ण राहील्याने १२ फेब्रुवारीला पुन्हा सर्वसाधारण सभा.

शिलाई मशीन व दर कराराचा मुद्दा गाजला
वाशिम : रखडलेली शिलाई मशीन योजना, इ-टेंडरिंगऐवजी दर कराराने खरेदी, रोहयोची अपूर्ण कामे, पाणीटंचाई, जिल्हा नियोजन व विकास समितीच्या कामांचे ह्य२५-१५ प्रमाणह्ण आदी विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कामकाज संपत नसल्याचे पाहून पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. स्थानिक जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या सभेला अध्यक्ष सोनाली जोगदंड, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, ज्योती गणेशपूरे, पानुताई जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला इतवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्यानंतर महिला सदस्यांनी शिलाई मशीन वाटपाचा मुद्दा छेडला. २0१५-१६ सत्र संपायला अवघा दीड महिना शिल्लक असतानाही शिलाई मशीनचे वाटप नसल्याने सदस्य आक्रमक झाले. दर करार आणि ई-टेंडरिंगच्या पेचात शिलाई मशीन अडकल्याचे पाहून महिला व बालकल्याण सभापती ज्योती गणेशपुरे यांनी हा प्रश्न आठवड्यात निकाली काढण्याच्या सूचना केल्या. सभापती सुभाष शिंदे यांनीदेखील शिलाई मशीन तातडीने वाटप झालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली. जलसंधारण, पाणीटंचाई, चाराटंचाई, दूष्काळ निवारणार्थ उपाययोजना, समाजकल्याण विभागांतर्गतची कामे आदी विषयांवर जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ सानप, श्याम बढे, नथ्थू कापसे, स्वप्निल सरनाईक, गजानन अमदाबादकर, विकास गवळी, सचिन रोकडे, गौरी पवार, सुधीर गोळे आदींनी प्रश्न मांडले. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य आणि दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना या दोन मुद्दय़ांना प्राधान्य देण्याच्या सूचना पदाधिकार्यांनी केल्या. यावेळी सहा पंचायत समित्यांच्या सभापतींनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणारी सहा वाहने नाकारून सदर निधी २0१५-१६ मधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना समप्रमाणात देण्याचा ठरावा घेतला. या कामी वीरेंद्र देशमुख, भास्कर पाटील, छाया पाटील, वर्षा नेमाने, धनश्री राठोड व कुसुम लबडे यांनी पुढाकार घेतला, हे विशेष.