बांधकामातील ‘अनियमितता’ रडारवर!
By Admin | Updated: May 25, 2017 01:48 IST2017-05-25T01:48:41+5:302017-05-25T01:48:41+5:30
जिल्हा परिषद शाळांमध्ये १५३ बांधकामे सुरू : तोंडगाव शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

बांधकामातील ‘अनियमितता’ रडारवर!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या, विज्ञान प्रयोग शाळा व स्वच्छता गृह अशी एकूण १५३ बांधकामे सुरू आहेत. कोणत्याही बांधकामातील अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याकडे काहींनी कानाडोळा केल्याची बाब ‘सीईओं’नी गांभीर्याने घेतली आहे. एका वर्गखोली बांधकामात अनियमितता सिद्ध झाल्याने मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण ७७९ शाळा असून, येथे शिक्षण दिले जाते. अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत, तसेच काही शाळांच्या वर्गखोली वादळवारा व अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाल्यात. परिणामी, दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांना एका वर्गखोलीत बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांतील वर्गखोली बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, स्वच्छता गृह आदींचे बांधकामासाठी विविध योजनेंतर्गत निधीची मागणी नोंदविली होती. ही मागणी मान्य झाल्याने आणि निधी उपलब्ध झाल्याने जवळपास १५३ बांधकाम सुरू आहेत. यामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत ९२ वर्गखोल्या, अल्पसंख्याक निधीमधून ४० वर्गखोल्या, पाच विज्ञान प्रयोग शाळा, १६ स्वच्छता गृह बांधकामाचा समावेश आहे. ही कामे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जात आहेत. या कामांतील दर्जा राखण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केलेल्या आहेत. कुणी तक्रार केली किंवा आकस्मिक पाहणीत काही अनियमितता झाल्याचे निदर्शनात आले, तर गंभीर परिणामाला सामोरे जाण्याचा इशाराही दिलेला आहे. तोंडगाव जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली बांधकामात अनियमितता झाल्याचे सिद्ध झाल्याने गणेश पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्याध्यापकाला निलंबित केले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे तोंडगावचे प्रकरण?
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा तोंडगाव शाळेला सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या १० लाख ९० हजार १२५ रुपयांच्या निधीपैकी ९ लाख ५० हजार रुपयांच्या आसपास रक्कम बँक खात्यातून उचल केली; परंतु बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या अभियंत्यांंनी केलेल्या मूल्यांकनानुसार झालेल्या बांधकामाचे मूल्यांकन ४ लाख ९४ हजार ९४० रुपये आहे. बँक खात्यातून जास्त रक्कम काढल्याचे निदर्शनात आल्याने आणि प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने मुख्याध्यापक गजानन परळीकर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले. हा निर्णय दिग्गज असलेल्या ‘गॉडफादर’ला जबर झटका मानला जात आहे.
शाळेच्या वर्गखोली बांधकामाचा दर्जा राखण्याच्या सूचना प्रत्येकाला दिलेल्या आहेत. कुणी अनियमितता करीत असेल, तर निश्चितच कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.
- गणेश पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम