मृत कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घ्या
By Admin | Updated: December 6, 2014 01:21 IST2014-12-06T01:21:00+5:302014-12-06T01:21:00+5:30
अनुकंपाधारक न्याय हक्क संरक्षण समितीचे धरणे.

मृत कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घ्या
वाशिम : महावितरण कंपनीतील मयत कामगारांच्या वारसांना नियमित सेवेत सामावून न घेता कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले जात आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याकरिता तसेच त्यांना न्याय मिळविण्याकरिता अनुकंपाधारक न्याय हक्क संरक्षण समितीच्यावतीने महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर विशाल धरणे देण्यात आले.
महावितरणच्या धोरणानुसार राज्यातील मयत कामगारांच्या वारसांना नियमित सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे; परंतु या नियमाला तिलांजली देत मयत कामगारांच्या वारसांवर अन्याय महावितरण प्रशासन करीत आहे. त्यांना नियमित सेवेत रागावून न घेता कंत्राटी पद्धतीने सहायक या पदावर सामावून घेतले जात आहे. या उलट महापारेषण, महाजनरेशन या कंपन्यांमध्ये मयत कामगारांच्या वारसांना नियमित सेवेत सामावून घेण्यात येत आहे. या धरणे आंदोलनामध्ये विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे झोनल सचिव धनराज सोनुने, एस.बी. मुराई, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ झोनल सचिव देशपांडे, वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस सी.एन. देशमुख, मानव विकास मंचचे मधुकरराव तायडे, सर्कल अध्यक्ष किरण कर्हाळे, सर्कल सचिव गणेश गंगावणे, अनुकंपाधारक न्याय हक्क संरक्षण समितीचे राज्य प्रमुख प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष प्रकाश वाघ, तांत्रिक अँप्रेंटिस असोसिएशनचे संघटन सचिव अतुल पाटील थेर उपस्थित राहून मान्यवरांनी अनुकंपाधारकांवरील अन्यायाविरुद्ध एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी महावितरण प्रशासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या; तसेच महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना अनुकंपाधारकांवरील अन्याय त्वरित दूर करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशा स्वरुपाचे निवेदनही देण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये शेकडो मयत कामगारांचे वारस सहभागी झाले होते.