घरकुलांची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश ! बीडीओंकडून कामांची पाहणी
By संतोष वानखडे | Updated: March 24, 2024 18:03 IST2024-03-24T18:03:10+5:302024-03-24T18:03:17+5:30
गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

घरकुलांची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश ! बीडीओंकडून कामांची पाहणी
संतोष वानखडे
वाशिम : घरकुलांची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच, घरकुलाचे काम पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींकडून दिलेल्या रकमेची वसुली करण्यात येईल, असा इशारा मंगरूळपीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी रविवारी दिला.
गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी विस्तार अधिकारी अविनाश ठाकुर, जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे, गोलवाडी येथील सरपंच पुष्पा गुलाबराव शिंदे, माजी सभापती तथा गोलवाडीचे जेष्ठ नागरिक रमेश शिंदे, ग्रामसेविका संगिता आवारे आणि फाळेगाव येथे सरपंच जनार्धन इंगोले, ग्रामसेवक जटाळे यांची उपस्थिती होती.
लोकसहभागासाठी घरोघरी भेटी
गोलवाडी आणि फोळेगाव येथील ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन ग्राम पंचायतचे थकित विद्युत बिल आणि नळपाणी योजनेचा १० टक्के लोकसहभाग भरण्याबाबतही माहिती देण्यात आली. याबाबत ग्रामस्थांना जागृत करण्यासाठी घरोघरी भेटी देण्याचे आवाहन बीडिओ सोनोने यांनी केले.