तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा ‘तो’ शेतकरी ठरतोय प्रेरणादायी
By Admin | Updated: January 15, 2017 19:54 IST2017-01-15T19:54:49+5:302017-01-15T19:54:49+5:30
एका एकरात तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा मांडवा येथील शेतकरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा ‘तो’ शेतकरी ठरतोय प्रेरणादायी
>ऑनलाइन लोकमत
शीतल धांडे /ऑनलाइन लोकमत
शीतल धांडे /ऑनलाइन लोकमत
रिसोड (वाशिम), दि. 15 - एका एकरात तूरीचे विक्रमी उत्पादन घेणारा मांडवा येथील शेतकरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तूर पीक पाहण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. बद्रीनारायण विक्रम कायंदे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मांडवा येथील बद्रीनारायण कायंदे हे शेतीत नवनवे प्रयोग करून इतरांपेक्षा अधिक उत्पादन घेतात. असाच प्रयोग त्यांनी तूर पिकासंदर्भात केला आहे. सहा एकरावर त्यांनी ‘ज्योती’ जातीच्या तूरीची १४ बाय दोन फुट अंतरावर लागवड केली. ५० टक्के सेंद्रीय व ५० टक्के रासायनिक खते दिली. शेतातील विहिरीच्या पाण्यातून ठिबकद्वारे तूरीला सिंचन केले. सेंद्रीय खतांमुळे तूर पीक चांगेलच बहरले, असे कायंदे म्हणतात. एका झाडाला कमीत-कमी दोन ते सव्वा दोन हजार शेंगा आहेत. लागवडीपासून ते आतापर्यंत त्यांना एकरी १५ हजार रुपयाच्या आसपास खर्च आला आहे. एकरी १५ ते १७ क्विंटल तूर होईल, असा विश्वास कायंदे यांनी व्यक्त केला. या तूरीच्या झाडांचे समूळ उच्चाटन न करता, केवळ छाटणी केली जाणार आहे. छाटणी केल्यानंतर पाणी देऊन परत उन्हाळी तूरीचे पीक घेतले जाईल, असे कायंदे म्हणाले. या तूरीच्या झाडांना सलग पाच वर्षे जगविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे लागवड खर्चात आपसूकच बचत होईल, असा दावा कायंदे यांनी केला. या तूरीच्या शेताची पाहणी करण्यासाठी कृषी सभापती विश्वनाथ सानप, कृषी विज्ञान केंद्र करडा येथील अधिकारी, कृषी अधिकाºयांसह विदर्भ व मराठवाड्यातील जवळपास १२०० ते १३०० शेतकरी आले होते, असेही कायंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. १५ हजार रुपये लागवड खर्च जाता एकरी ८५ हजार रुपयांच्या असपास उत्पादन या रब्बी हंगामात आणि त्यानंतर उन्हाळी हंगामात ८० हजार रुपयाच्या आसपास उत्पादन मिळेल, असा विश्वास कायंदे यांनी व्यक्त केला.