ग्रामपंचायतींच्या गैरप्रकाराची चौकशी
By Admin | Updated: January 2, 2015 01:05 IST2015-01-02T01:05:11+5:302015-01-02T01:05:11+5:30
वाशिम जिल्हयातील ४१७ प्रकरणांची चौकशी ; ५ कोटी ३९ लाख ६९ हजार रूपयाची अफरातफर झाल्याचा संशय.

ग्रामपंचायतींच्या गैरप्रकाराची चौकशी
वाशिम : जिल्हयातील विविध ग्रामपंचायतीमधील अनियमितता चव्हाटयावर आली असून अफरातफरीचा आकडा जवळपास साडेपाच कोटी रूपयापर्यंंंत पोहचला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अंतर्गंत पंचायत स्तरावर विशेष पथकाने चौकशीला सुरूवात केली आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतीमधील ४१७ प्रकरणांमध्ये छोटे- मोठे भ्रष्टाचार, लेखापरिक्षणातील आक्षेपासह ५ कोटी ३९ लाख ६९ हजार १८७ रूपयांच्या अफरातफर झाल्याची शंका आहे. संशयीत रकमेची प्रशासकीय चौकशीस प्रारंभ झाला असून यामध्ये १ लाख रूपयांच्यावर अफरातफर असलेल्या १२३ प्रकरणांचा समावेश आहे. तर इतर २९४ असे एकूण ४१७ प्रकरणांचा समावेश आहे. सदर प्रकरणी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत यांच्याकडे प्रकरणाचा अंतिम अहवाल गेल्यानंतरच दोषीवर कारवाई केल्या जाणार आहे. एक लाखावरील १२३ प्रकरणे वगळता २९४ प्रकरणामध्ये ६८ लाख ९२ हजार १0९ रूपये गैरप्रकाराचा संशय असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. १२३ प्रकरणांमध्ये तालुकानिहाय वाशिममध्ये १३ प्रकरणे, रिसोड १५, मालेगाव १८, मंगरूळपीर १८, मानोरा २२ तर मानोरा तालुक्यात ३७ प्रकरणांच समावेश आहे. या प्रकरणांमधील गैरप्रकाराची संशयीत रक्कम ४ कोटी ७0 लाख ७७ हजार ७८ रूपये एवढी आहे. यामध्ये तालुकानिहाय वाशिम तालुका ४३ लाख ५२ हजार ८७२, रिसोड ६४ हजार १९ हजार ८७, मालेगाव तालुक्यात ६६ लाख १९ हजार १५४, मंगरूळपीर तालुक्यात ७४ लाख १९ हजार ४७१, मानोरा तालुक्यात १ क ोटी १२ लाख ५६ हजार ९२ तर कारंजा तालुक्यात १ कोटी १0 लाख २६ हजार ६७१ हजार रूपयांचा अफरातफरीचा समावेश आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला असून दोषि आढळणार्या ग्रामपंचायतीवर कारवाई केल्या जाणार आहे. मंगरूळपीर तालुक्यातील १५ ग्रामपंचायत मध्ये मागील काळात अफरातफर झाल्याचे १८ प्रकरणो जि.प.प्रशासनाकडे प्रलंबीत होते.परंतु आज पावतो सदर अफरातफर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.परंतु मुख्यकार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत यांच्या आदेशानुसार पंचायत समिती स्तरावरून अफरातफर प्रकरणात अडकलेल्या १५ ग्रामपंचायत मधील १८ प्रकरणाची चौकशी गतीने सुरू असुन काही ग्राम पंचायतीची चौकशी पुर्ण झाली असुन त्यांच्याकडुन अफरातफरीची रक्कम वसुल करण्या संदर्भात कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.