इको फ्रेंडली होळीसाठी कृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:03+5:302021-02-14T04:38:03+5:30
गेल्या काही वर्षांपासून धूलिवंदनाच्या सणात रासायनिक रंगाचा वापर वाढला आहे. या रंगाच्या वापरामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारे विविध ...

इको फ्रेंडली होळीसाठी कृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार
गेल्या काही वर्षांपासून धूलिवंदनाच्या सणात रासायनिक रंगाचा वापर वाढला आहे. या रंगाच्या वापरामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारे विविध दुष्परिणाम आणि घडणाऱ्या घटना वारंवार ऐकायला मिळतात. ही बाब अतिशय गंभीर असून, वाशिम जिल्ह्यात रासायनिक रंगाचा वापर टाळला जाऊन लोकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या गृहविज्ञान शाखेंतर्गत पर्यावरण पूरक रंग तयार करण्यासह विक्री व्यवस्थापन विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण ११ फेब्रुवारीला घेण्यात आले. यात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.आर. एल. काळे यांनी प्रशिक्षाणार्थ्यांना इको फ्रेंडली रंग निर्मितीचे तंत्र अवगत करून बचत गटाच्या माध्यमातून हे रंग तयार करून स्वयंरोजगार निर्माण करावा, तसेच इको फ्रेंडली होळी साजरी करून शेतीसाठी उपयुक्त पर्यावरण निर्मितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानंतर, तांत्रिक सत्रात गृहविज्ञान शाखेच्या शुभांगी वाटाणे यांनी इको फ्रेंडली रंग का वापरावे, ते पर्यावरणास व मानवी आरोग्याच्या दृष्टीने कसे हितकारक आहे, हे पटवून देत, इको फ्रेंडली रंग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कृती, यावर भर देत, त्याचे आवरण कसे असावे, तसेच विक्री व्यवस्थापनावर कसे करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. सूत्रसंचालन एस.आर. बावस्कर यांनी केले.