पावसाअभावी उद्योग, व्यवसाय थंडावले

By Admin | Updated: August 27, 2014 00:12 IST2014-08-27T00:12:33+5:302014-08-27T00:12:33+5:30

गतवर्षीपेक्षा खुपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकटही ओढवले आहे.

The industry wasted no rain, the business stopped | पावसाअभावी उद्योग, व्यवसाय थंडावले

पावसाअभावी उद्योग, व्यवसाय थंडावले

मंगरुळपीर : यंदा आजवर झालेल्या अत्यल्प पावसाचा समाजाच्या सर्वच स्तरावर प्रभाव पडलेला दिसत आहे. लहानमोठे उद्योगधंदे थंडावले आहेत, शेतीची कामेही बंद पडल्यामुळे हातमजुरीवर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असताना गतवर्षीपेक्षा खुपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकटही ओढवले आहे. राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वीच राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवल्यानंतर आता शेतात असलेले पिकही पावसाअभावी सुकत आहेत. पाऊसच नसल्यामुळे कित्येक ठिकाणी शेतीमधील कामे बंद पडली आहेत. उत्पादनात वाढ होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे शेतकर्‍यांनी खत टाकण्यासह निदंन खुरपणासारख्या गोष्टींवर खर्च न करणेच पसंत केले आहे. पाऊसच नसल्यामुळे बांधकाम व्ययसायही बंद पडल्याने या क्षेत्रातील मजुरांना दुसर्‍या रोजगाराचा शोध घेत भटकावे लागत आहे. उपाहारगृहे, चहाच्या टपर्‍या आदि दुकानांवर गर्दी दिसत असली तरी, त्यामध्ये ग्राहकांची संख्या फारच नगण्य आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात खरीपातील मुग, उडीदाची बाजारात खरेदी सुरू होते; परंतु यंदा थोड्याफार पावसावर पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पेरण्या दोन वेळा उलटल्या, त्यानंतर अनेकांनी मुग, उडीद या सारख्या पिकांकडे पाठच फिरविली. परिणामी मुग, उडीद कृषी उत्पन्न बाजारात दिसेनासेच झाल्याने या क्षेत्रातील मापारी, हमाल, अडत्यांचे सहकारी आदिंवर उपासमारीची पाळी आली आहे.

Web Title: The industry wasted no rain, the business stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.