बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ!
By Admin | Updated: May 23, 2016 01:30 IST2016-05-23T01:30:03+5:302016-05-23T01:30:03+5:30
वाशिम जिल्ह्यात २00७ मध्ये ६२ तर २0१५ मध्ये ९१ बालमृत्यू

बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ!
शिखरचंद बागरेचा/वाशिम
बालमृत्यूंचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाशिम जिल्ह्यात मात्र बालमृत्यूंच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढच होत असल्याची बोलकी आकडेवारी आहे. सन २00७-0८ मध्ये असलेल्या ६३ बालमृत्यूचा आकडा सन २0१५-१६ मध्ये ९१ वर पोचला आहे. सन २00७-0८ मध्ये ६२ बालमृत्यू होते. यामध्ये सन २00८-0९ मध्ये कमालीची वाढ होऊन हा आकडा १0३ वर पोचला होता. . बालमृत्यूच्या वाढत्या प्रमाणाच्या पृष्ठभूमीवर २0१५ मध्येही फारसे गांभीर्य न दाखविल्याने सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यात ९१ बालमृत्यू झाले.
बालमृत्यू दर कमी करण्याच्या नावाखाली केंद्र व राज्य शासन आरोग्य विभागावर अक्षरश: पैशाचा पाऊस पाडत आहे. लाखो रुपयांची तरतूद असलेले उपक्रम व योजना वाशिम जिल्ह्यातही सुरू आहेत. तथापि, बालमृत्यू दराचा आकडा कमी करण्यात २00७ पासून २0१५ पर्यंंत यश आले नसल्याची शोकांतिका आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतींचे प्रमाण कसे वाढेल, या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण समोर करून गर्भवती महिलांना ह्यरेफर टु सिव्हिल हॉस्पिटलह्णचा सल्ला दिला जातो. दुर्गम भागात घरीच प्रसूती होत असल्यानेही बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येते.