बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा!

By Admin | Updated: April 15, 2017 01:50 IST2017-04-15T01:50:19+5:302017-04-15T01:50:19+5:30

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी : सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

Imagine Babasaheb's thoughts! | बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा!

बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा!

वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अतिशय कमी कालावधीत विविध शास्त्रांच्या पदव्या संपादन केल्या. कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे युवा वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या शुक्रवारी झालेल्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या कार्यक्रमास समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सामाजिक कार्यकर्ते अनंतकुमार जुमडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात १४ एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा समान विकास होण्यास मदत होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यांच्या या विचारांना अनुसरूनच शासन व प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करीत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करीत विविध शास्त्रांचे ज्ञान संपादन केले. त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या युवा पिढीने ज्ञानार्जन करून आपली प्रगती साधण्याची गरज आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द असणे आवश्यक असते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन युवकांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जुमडे यांनीही विचार व्यक्त केले.
सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त केदार यांनी प्रास्ताविक केले. संचालन शीतल उजाडे यांनी केले; तर प्रा. यू. एस. जमदाडे यांनी आभार मानले. यावेळी श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय व श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
--

Web Title: Imagine Babasaheb's thoughts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.