अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त

By दिनेश पठाडे | Published: April 12, 2024 07:58 PM2024-04-12T19:58:19+5:302024-04-12T19:58:34+5:30

रिसोड येथे पथकाची कारवाई ; अकोला जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल.

Illegal liquor supply from Akola to Risoda Items seized along with the vehicle | अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त

अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त

वाशिम : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू विक्री, वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथक तयार केले आहे. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रिसोड येथे धाड टाकली असता, एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहन व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ११ व १२ एप्रिलला पथकाने दोन ठिकाणी धाड टाकली. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलू शिवारात एका दुचाकीवरून देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असताना दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दुचाकी वाहनासह देशी दारूचे तीन बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच रिसोड शहरातून अवैधरीत्या देशी, विदेशी दारूची वाहतूक होत असल्याने याठिकाणी संशयित वाहनाची तपासणी केली असता, चारचाकी वाहनातून (क्रमांक एमएच ३०-बीडी ३९१७) अवैधरीत्या विनापरवानगी ठेवलेल्या देशी दारूच्या ९६ बाटल्या, विदेशी दारूच्या १०३ आणि बीअरच्या २४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. वाहनांसह ५ लाख ८५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंकज शारदाप्रसाद दीक्षित, ज्ञानेश्वर प्रकाश गावंडे (दोन्ही रा. कव्हरनगर, अकोला), तसेच गोविंदा शंकर घनगाव, कार्तिक संतोष घनगाव (रा. पिंजर, ता. बार्शिटाकळी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त अ. ना. ओहोळ, अधीक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक के. डी. वराडे, एस. डी. चव्हाण, के. ए. वाकपांजर, निवृत्ती तिडके, दीपक राठोड, स्वप्नील लांडे, बाळू वाघमारे, विष्णू मस्के, नितीन चिपडे, ललित खाडे, पी. एम. वाईकर यांनी केली.

आचारसंहितेत ठोक विक्री करणाऱ्यावर कारवाई
आचारसंहिता कालावधीमध्ये देशी, विदेशी दारूची ठोक विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने रिसोड शहरातील ईलाइट वाईन शॉप या अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय नियमभंग प्रकरणाची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास निरीक्षक जी. व्ही. पाटील हे करीत आहेत.
 

Web Title: Illegal liquor supply from Akola to Risoda Items seized along with the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला