‘इंडियट बॉक्स’च्या माध्यमातून व्यवसायिकांना बनविले ‘इडियट’
By Admin | Updated: March 20, 2015 01:13 IST2015-03-20T00:46:34+5:302015-03-20T01:13:33+5:30
नागपूर येथील चित्रांश कंपनीचा प्रताप, अकोल्यातील व्यापा-यांची दीड कोटींनी फसवणूक.

‘इंडियट बॉक्स’च्या माध्यमातून व्यवसायिकांना बनविले ‘इडियट’
अकोला - नागपूर येथील चित्रांश कंपनीने इंडियट बॉक्स लागल्यानंतर त्यावर प्रसारित होणार्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमाविण्याचे आमिष दाखवत शहरातील सुमारे ३४८ प्रतिष्ठानांच्या संचालकांना १ कोटी ३३ लाख रुपयांनी गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश वटले नसल्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. चौकशीतून श्रीसूर्या प्रकरणानंतर आणखी एक कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागपूर येथील चित्रांश टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इंडियट बॉक्सची एक योजना बड्या प्रतिष्ठानांसाठी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कंपनी संबंधित प्रतिष्ठानामध्ये ३२ इंचाचा एलईडी टीव्ही लावून देईल. त्या मोबदल्यात संबंधित प्रतिष्ठाणाच्या संचालकांकडून अनामत रक्कम म्हणून ३५ हजार रुपयांचा धनादेश घेण्यात आला. या एलक्ष्डी टीव्हीवर दिवसभर व्यावसायिक जाहिराती प्रसारित होतील. त्याचा मोबदला म्हणून प्रतिष्ठानच्या संचालकांना सुरुवातीचे सहा महिने सात हजार रुपये, त्यानंतरचे सहा महिने आठ हजार रुपये व त्यानंतर नेहमीसाठी १0 हजार रुपये दरमहा मिळणार होते. ह्यइंडियट बॉक्सह्णच्या या मोहजालात अडकत शहरातील तब्बल ३४८ प्रतिष्ठानांच्या संचालकांनी या कंपनीशी करार केला व ३५ हजारांची रक्कम दिली. अशाच करारातून आकोट स्टॅन्ड परिसरातील रहिवासी आसिम शहजाद यांना सुमारे १४ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. हा धनादेश बँकेत वटला नाही. आसिम यांनी २४ नोव्हेंबर २0१४ रोजी ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम कंपनीकडे जमा केली. त्यानंतर कंपनीने त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये ३२ इंची एलक्ष्डी टीव्ही लावला. यावर २४ तास व्यावसायिक जाहिराती दाखविण्यात येत होत्या. सुरुवातीला काही महिने सात हजार रुपयांचे धनादेश मिळाल्याने त्यांचा यावर विश्वास बसला; मात्र २८ फेब्रुवारी रोजी दिलेला १४ हजार रुपयांचा धनादेश न वटल्याने त्यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी आसिम यांना टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे आसिम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीणा यांच्याकडे केली. चित्रांश कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे
. *चित्रांशच्या नागपुरातील कार्यालयात तोडफोड
चित्रांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नागपुरातील प्रतिष्ठाणांनाही गंडविले. धनादेश न वटल्याच्या कारणावरून कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयात यापूर्वी दोन ते तीन वेळा तोडफोड करण्यात आली होती.
*अकोल्यात ३४0 जणांनी केला करार
चित्रांश कंपनीशी अकोला शहरातील तब्बल ३४८ प्रतिष्ठानांच्या संचालकांनी करार केला आहे. या ३४८ जणांनी प्रत्येकी ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम कंपनीकडे जमा केली. त्यानुसार सुमारे एक कोटी २३ लाख ५५ हजारांची रक्कम कंपनीने शहरातून नेली आहे.