ढगाळ वातावरणाने उडविली शेतकर्यांची धांदल
By Admin | Updated: October 27, 2014 01:04 IST2014-10-27T01:04:27+5:302014-10-27T01:04:27+5:30
वाशिम जिल्ह्यात रिमझिम; कापणीयोग्य पीक धोक्यात.

ढगाळ वातावरणाने उडविली शेतकर्यांची धांदल
वाशिम : दिवाळीचा आनंदोत्सव ओसरत नाही, तोच ढगाळी वातावरणानेही शेतकर्यांचे दिवाळे काढणे सुरू केले आहे. एकापाठोपाठ संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांच्या मागचे संकट अद्यापही संपलेले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस बोंडांतून फुटून निघाला असताना ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडत असून, या वातावरणाने शेतकर्यांच्या मनात पुन्हा धडकी भरविली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्यांना सातत्याने बसत आहे. यंदा तर संकटांची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातून वाचलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाने पुन्हा दगा दिला. अपरिपक्व शेंगांत ज्वारीच्या दाण्याएवढे सोयाबीन आहे. एकरी दहा पोते व्हायचे, तेथे दोन पोतेही होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शेतकरी सोयाबीन काढणीच्या तयारीला लागला. नेमकी हीच वेळ साधून पुन्हा निसर्गाची अवकृपा होत आहे. शुक्रवारी रात्रीपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण रविवारी अधिकच गडद झाले. आकाशात दिवसभर काळे ढग जमले होते. मालेगाव तालुका व जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. बदलते वातावरण पाहून शेतकर्यांच्या उरात धडकी भरली. सोंगणी केलेले सोयाबीन झाकण्यासाठी रविवारी दिवसभर शेतकर्यांची धांदल होती. आधीच उत्पन्नाची हमी नाही, त्यातच ताडपत्र्या आणून सोयाबीन झाकावे लागत आहे. सोयाबीनसारखीच कपाशीची स्थिती आहे. पाऊस आल्यास फुटलेले बोंड पावसामुळे मातीत मिसळण्याची भीती आहे. अशा स्थितीत कापूस आणि सोयाबीन आता पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.