७०० मीटर रस्त्याला अजून किती दिवस लागणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:24+5:302021-08-28T04:45:24+5:30
वाशिम : शहरातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात सर्वात वर्दळीचा असलेला सिंधी कॅम्प ते अकाेला नाका रस्त्याचे काम ...

७०० मीटर रस्त्याला अजून किती दिवस लागणार ?
वाशिम : शहरातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात सर्वात वर्दळीचा असलेला सिंधी कॅम्प ते अकाेला नाका रस्त्याचे काम संथगतीने सुरु असल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. केवळ ६०० ते ७०० मीटर असलेल्या या रस्त्याचे काम महिनाे उलटूनही पूर्ण न झाल्याने अजून किती दिवस या रस्त्याच्या कामाला लागणार असा प्रश्न त्रस्त शहरवासीय करताना दिसून येत आहेत.
वाशिम नगरपरिषद क्षेत्रात येत असलेल्या या रस्त्याचे काम बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. एका बाजूचा थाेडासा रस्त्याच्या कामाव्यतिरिक्त जवळपास संपूर्ण काम पूर्ण हाेणे बाकी आहे. या रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून त्यात डबके तयार झाले आहेत. यातून वाहने काढताना वाहनचालकांना माेठी कसरत करण्याची वेळ आली आहे. पाऊस नसला की, धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर असलेले व्यापारी सुद्धा रखडलेल्या रस्ता कामामुळे त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिकांनी तर चक्क या रस्त्यावरुन येणे बंद करुन दुसरा मार्गाचा वापर करीत आहेत. तरी संबंधितांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम लवकर हाेईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी हाेत आहे.
.......................
व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम
सिंधी काॅलनी ते अकाेला नाका रस्ता दरम्यान अनेक किराणा, मेडिकल सह विविध प्रतिष्ठाने आहेत. या रस्ता कामामुळे वाहन उभे करण्यासाठी जागा नसल्याने व या रस्त्यावरुन चालणे सुध्दा कठीण असल्याने ग्राहक या भागातील दुकानांवर जात नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. संबंधितांनी लक्ष देऊन या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणीही त्यांच्याकडून हाेत आहे.
अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या रस्त्याच्या कामासाठी आपण संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच नागरिकांना हाेणारा त्रास पाहता लवकरात लवकर काम पूर्ण हाेण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. याकरिता आपणास आंदाेलन करण्याची वेळ आली तरी चालेल.
- सागर गाेरे,
नगरसेवक, वाशिम
अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या या रस्ता कामामुळे वाहनांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे दिवसेंदिवस माेठे हाेत आहेत, मात्र रस्त्याचे काम काही पूर्ण हाेईना. याकडे लाेकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पाठपुरावा करुन या रस्त्याचे काम मार्गी लावावे.
- ओम कव्हर,
वाशिम
माझा ऑटाेचा व्यवसाय आहे. या रस्त्यावरुन जायचे म्हटल्यास नकाेसे वाटते. अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. आज ना उद्या हाेईल अशी अपेक्षा आहे परंतु महिने उलटत आहेत परंतु रस्त्याचे काम काही पूर्ण हाेईना. अतिशय छाेट्या असलेल्या या रस्त्याला इतका वेळ कसा ?
- बाळू भाेयर,
वाशिम