आगीत हॉटेल खाक
By Admin | Updated: March 28, 2015 01:44 IST2015-03-28T01:44:42+5:302015-03-28T01:44:42+5:30
बुलडाणा येथील घटना; पावने चार लाख रुपयांचे नुकसान.

आगीत हॉटेल खाक
बुलडाणा : अचानक शॉटसर्किट होऊन लागलेल्या आगीत संगम चौकातील संगम स्विट मार्ट जळून खाक झाले आहे. या घटनेत हॉटेल मालकाचे जवळपास पावने चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २७ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील अत्यंत गजबजलेल्या संगम चौकात विनोद दिनकर कुळकर्णी यांच्या मालकीची संगम स्विट मार्ट नावाची हॉटेल आहे. गुरूवारी रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांनी व्यवसाय करून हॉटेल बंद केले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक शॉटसर्किट होऊन हॉटेलला आग लागली. हॉटेलमध्ये लाकडी फर्निचर असल्यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत हॉटेलमधील फर्निचर, रेफ्रिजरेटर, भांडे व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत हॉटेल मालकाचे ३ लाख ७0 हजार ४४ रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सकाळी पाच वाजेच्या सुमारास काही नागरिकांना हॉटेलमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती हॉटेलमालक कुळकर्णी यांना दिली. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले; परंतु तोपर्यंत होटल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी गणेश देशमुख यांनी घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा केला.