हाॅटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:45+5:302021-04-06T04:40:45+5:30
शासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये ५ ते ३० एप्रिल या कालावधीत उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील; पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा ...

हाॅटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली
शासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये ५ ते ३० एप्रिल या कालावधीत उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील; पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर तेथे राहणाऱ्या केवळ अभ्यागतांसाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तींसाठी प्रवेश असणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मात्र वाशिम शहर व परिसरातील छोट्या-मोठ्या हाॅटेल्समध्ये भाजी, पोळ्या यासह इतर स्वरूपातील स्वयंपाकाची कामे करणाऱ्या महिलांचा रोजगार हिरावून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळणार आहे.
......................
वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक
गतवर्षी एप्रिल महिन्यापासून वाशिम जिल्ह्यात कोरोनाची सुरूवात झाली. त्याच्या काहीच दिवसांत सर्वत्र लाॅकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे हाॅटेल्सही बंद राहिल्या.
या काळात हाॅटेल्समध्ये काम करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील महिलांचा रोजगार हिरावला गेला. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली होती.
हाॅटेल्समध्ये काम करून तुटपुंज्या प्रमाणात पगार मिळतो. त्यावर समाधान मानून अनेक महिलांनी नोकरी पत्करली; मात्र अचानक रोजगार हिरावल्याने वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक, असे संबंधित महिलांनी सांगितले.
...................
शहरातील हाॅटेल्सची संख्या
३५
पोळी-भाजी करणाऱ्या महिलांची साधारण संख्या
८०
..............
कोट :
हाॅटेल्सच्या किचनमध्ये पोळी-भाजी करण्याचे काम मी करते. या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला असून कुटुंबाला हातभार लावणे शक्य झाले; मात्र आता हाॅटेल्स बंद राहिल्यास आर्थिक अडचण उद्भवणार आहे.
- सुनंदा गायकवाड
............
गतवर्षी कोरोनामुळे नव्हे; तर लाॅकडाऊनमुळे हाॅटेल्स बंद होऊन रोजगार हिरावल्याने मोठे संकट कोसळले होते. तशी परिस्थिती आता पुन्हा उद्भवू नये. मायबाप शासनाने हाॅटेल्स बंद करण्याऐवजी कोरोनाचे नियम अधिक कठोर करावे.
- चित्रा कांबळे
.........................
वाशिमसारख्या ठिकाणी महिलांना करता येण्याजागे कुठलेही उद्योगधंदे नाहीत. रोजगार मिळणे अशक्य आहे. त्यामुळे हाॅटेल्समध्ये पोळी-भाजी करण्याचे काम स्वीकारले. आता महिनाभर हाॅटेल्स बंद झाल्यास रोजगार हिरावून संकट कोसळणार आहे.
- किरण भंडारे