हातभट्टी अड्ड्यांवर धाड; तीन लाखाचा माल जप्त!
By Admin | Updated: April 12, 2017 01:33 IST2017-04-12T01:33:11+5:302017-04-12T01:33:11+5:30
वाशिम : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत तब्बल तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.

हातभट्टी अड्ड्यांवर धाड; तीन लाखाचा माल जप्त!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल
वाशिम : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत तब्बल तीन लाख रुपयांचा माल जप्त केला.
१० एप्रिल रोजी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुलाब भीमराव ताजणे (वय ५० वर्षे) व शेख जफार शेख गफार (वय ३८ वर्षे, दोन्ही रा. आढळनगर, रिठद) यांच्या राहत्या घरी व रिठद शेतशिवारात अशा दोन ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये सडवा मोहमाच ६०० लिटर, १५ लिटर गावठी दारु व साहित्य असा एकंदरित ३० हजार ५५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पिंपळगाव इजारा शेतशिवारामध्ये रमेश रामू राठोड (वय ५५ वर्षे, रा.पिंपळगाव इजारा) याच्या शेतातील कोठामध्ये छापा टाकला असता, सडवा मोहामाच ९२५ लिटर (किंमत ६४ हजार ७५०) रुपये आढळून आला. कारंजा पोलीस स्टेशनांतर्गत शहरातील गवळीपुरा येथील कासम कालू निमसुरवाले (वय ५० वर्षे, रा.गवळीपुरा, कारंजा) याच्या आनंदनगर येथील घरामध्ये छापा टाकला असता, २ हजार ९६५ लिटर सडवा मोहामाच व साहित्य असा एकूण २ लाख ८ हजार रुपयाचा माल आढळून आला. चार ठिकाणी झालेल्या कारवाईत एकंदरित ३ लाख ३ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करून मोक्यावरच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सोळंके, पोहेकाँ प्रदीप चव्हाण, रवि घरत, इंगोले, नागोराव खडके, नागरे, महेंंद्र जाधव यांनी केली.
ढोणी येथेही कारवाई
मंगरुळपीर : तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढोणी येथे ठाणेदार विनायक जाधव यांच्या पथकाने धाड टाकून ३४ हजार ५०० रुपयांची अवैध गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी आरोपी आनंदा मोरे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत ठाणेदार जाधव यांच्यासह अशोक पाटील, शेषराव डाबेराव, राजू महल्ले आदींनी सहभाग नोंदविला.