उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली!
By Admin | Updated: April 21, 2017 01:13 IST2017-04-21T01:13:37+5:302017-04-21T01:13:37+5:30
रिसोडवरून रिठदकडे जाणाऱ्या ११०० के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिनीमधील ४४० के.व्ही.ची वाहिनी अचानक तुटल्यामुळे मोठा ‘शॉर्ट सर्किट’ होऊून अनेकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळून खाक झाली.

उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली!
रिसोड : शहरातील वाशिम-रिसोड मार्गावरील शिवाजी वसाहतीमध्ये २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रिसोडवरून रिठदकडे जाणाऱ्या ११०० के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिनीमधील ४४० के.व्ही.ची वाहिनी अचानक तुटल्यामुळे मोठा ‘शॉर्ट सर्किट’ होऊून अनेकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
या घटनेनंतर अनेकांच्या घरात मोठा आवाज होऊन इलेक्ट्रिक मीटर, फ्रीज यासह इतर उपकरणे जळाली. ४४० केव्हीची वाहिनी तुटून खाली पडल्यामुळे वाहिनीखाली असलेल्या गवताने पेट घेतला; परंतु आग वाढण्याआधीच जमलेल्या नागरिकांनी आपापल्या घरातील पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे शिवाजी वसाहतीमध्ये एकच गोंधळ उडाला होता. वसाहतीमधील कुंदन कोल्हे यांचे मीटर जळून खाक झाले. यासोबतच नरवाडे, प्रफुल देशमुख, विठ्ठल सरनाईक, जाधव, गिरी, प्रा.भागवत मोरे, नारायण निर्बाण, यांच्या घरामधील लाइट, पंखे, फ्रीज, टी.व्ही, कुलर, ही उपकरणे निकामी झाली आहेत.