नुकसान न झालेल्या शेतक-यांना मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 02:53 IST2015-06-10T02:53:06+5:302015-06-10T02:53:06+5:30

नुकसानग्रस्तांना डावलले ; शेतकर्‍यांचा आरोप.

Help to the farmers who did not get damaged! | नुकसान न झालेल्या शेतक-यांना मदत !

नुकसान न झालेल्या शेतक-यांना मदत !

वाशिम : तालुक्यातील दूधखेडा येथील तलाठी व कृषी अधिकारी यांनी संगनमत करुन नुकसान न झालेल्या शेतकर्‍यांना गारपीट नुकसानाची मदत दिली तर खर्‍या लाभार्थ्यांना डावलले असल्याची तक्रार दूधखेडा येथील शेतकर्‍यांनी संबंधितांकडे केली आहे. दूधखेडा येथील काही शेतकर्‍यांची संबंधित अधिकारी यांनी सर्वेक्षणावेळी नुकसानाची टक्केवारी कमी दाखविल्याने अनेक गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना अल्प मदतीवर समाधान मानावे लागले. तर ज्या शेतकर्‍यांचे नुकसानच झाले नाही, अशा शेतकर्‍यांना गारपीट नुकसान मोठया प्रमाणात झाले म्हणून जास्त मदत मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. याबाबत अन्याय झालेल्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. येथील अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तलाठी व कृषी अधिकारी यांनी संगनमत करुन आमच्या नुकसानाची टक्केवारी कमी दाखविली. तसेच ज्यांच्या शेतात गहू, हरभरा व काही पेरणीच नसतानासुद्धा त्यांच्या शेतामध्ये पेरणी दाखवून, नुकसानीची टक्केवारी जास्त दाखवून यादीत नावे समाविष्ट केली आहेत. यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अल्प मदत व ज्यांचे नुकसानच झाले नाही अशांना भरघोस मदत असा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन अन्याय ग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची मागणी पृथ्वीराज राठोड, बाळु राठोड, मंगेश भोयर, अंबादास पवार, अशोक राठोड, सुदर्शन राठोड, रवी राठोड, प्रभु पवार, श्यामराव पवार, युवराज जाधव, वसंता राठोड, कमलासिंग राठोड , दशरथ राठोड या शेतकर्‍यांनी केली आहे.

Web Title: Help to the farmers who did not get damaged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.