हेलिकॉप्टर अकोल्यात, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री औरंगाबादेतच!
By Admin | Updated: October 13, 2014 00:54 IST2014-10-12T23:50:53+5:302014-10-13T00:54:04+5:30
समन्वयाचा अभाव; शिवराजसिंह चौहान राहिले ताटकळत.
_ns.jpg)
हेलिकॉप्टर अकोल्यात, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री औरंगाबादेतच!
अकोला: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना औरंगाबाद येथून अकोला येथे आणण्यासाठी मुंबईहून निघालेले हेलिकॉप्टर, पायलटचा गोंधळ आणि यंत्रणेतील समन्वयाच्या अभावामुळे औरंगाबादऐवजी थेट अकोल्यात पोहोचल्याचा प्रकार रविवारी घडला. या प्रकारामुळे हेलिकॉप्टर अकोल्याहून परत येईपर्यंत चौहान यांना औरंगाबाद विमानतळावरच ताटकळत राहावे लागले आणि त्यामुळे त्यांची अकोल्यातील सभा तब्बल साडेतीन तास उशिरा सुरु झाली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवराजसिंह चौहान यांची प्रचारसभा रविवारी सकाळी ९.३0 वाजता अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी चौहान भोपाळहून औरंगाबाद येथे विमानाने आणि तेथून हेलिकॉप्टरने अकोला येथे येणार होते; मात्र त्यांच्या दौर्याचे व्यवस्थित समन्वय झाले नाही. त्यामुळे मुंबईहून निघालेले हेलिकॉप्टर औरंगाबादला न थांबता थेट अकोल्यात पोहोचले. औरंगाबादमध्ये हेलिकॉप्टरच्या प्रतिक्षेत विमानतळावर ताटकळत बसलेले चौहान यांना ही बाब समजल्यानंतर, त्वरेने हालचाली झाल्या. त्यानंतर हेलिकॉप्टर अकोल्याहून पुन्हा औरंगाबाद येथे बोलविण्यात आले. या गोंधळात दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर अकोला विमान तळावर पोहोचले. त्यामुळे सभेला उशिर होऊन, चौहाण यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.