सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: April 15, 2017 01:43 IST2017-04-15T01:43:04+5:302017-04-15T01:43:04+5:30
पाण्यासाठी वणवण : समस्या निवारणासाठी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात

सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई
मालेगाव : तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची घडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी करण्यासाठी गावातील महिलांनी गुरुवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.
मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथे ग्रामस्थांसाठी पाणी पुरवठ्याची विशेष किंवा ठाम व्यवस्था नाही. या ठिकाणी खासगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, ही विहीर मार्च महिन्यात कोरडी पडते. त्यामुळे गावकऱ्यांना एक किलोमीटर अंतरावरून उन्हातान्हात पायपीट करीत डोक्यावर पाणी आणावे लागते. महिला वर्ग पाण्यासाठी भटकंती करीत असल्याने मुला-बाळांना त्याची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, स्वच्छ अभियानांतर्गत शौचालयांचे ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असले, तरी पाणीच नसल्याने शौचालयांचा वापर ग्रामस्थांना करणे अशक्य होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सोमठाणा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन सोमठाण्याच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज
मालेगाव तालुक्यातील सोमठाणा या गावात पाणीटंचाई ही समस्या पूर्वापार चालत आली आहे. या गावातील लोकांना प्रत्येक उन्हाळ्यात या समस्येचा सामना करावा लागतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी या समस्येवर आपल्या स्तरावरून उपाय करण्याचे प्रयत्न करीत असले, तरी त्यांना वरिष्ठ स्तरावरून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्यानंतरच येथील ग्रामस्थांची पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकेल.