रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST2021-09-26T04:45:44+5:302021-09-26T04:45:44+5:30
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यात शनिवारी दुपारनंतर तालुक्यात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे तालुक्यातील ...

रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यात शनिवारी दुपारनंतर तालुक्यात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे तालुक्यातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले. जवळपास दोन तास झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढणीवर आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. अतिपावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
००००००००००००००
पुरात वाहून गेल्याने दोन गुरांचा मृत्यू
शनिवारी तालुक्यात आलेल्या पावसामुळे वडजी येथील नाल्यास पूर येऊन त्यात शेतकरी बबनराव किसनराव बोरकर यांचे दोन बैल व एक म्हैस, अशी तीन गुरे पुरात वाहून गेली. त्यापैकी एक बैल व एक म्हैस दगावली. त्यामुळे शेतकरी बोरकर यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या तिन्ही जनावरांची किंमत अंदाजे एक लाख रुपयाच्या आसपास आहे. संबंधित शेतकऱ्याला त्वरित मदत मिळण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल भुतेकर यांनी केली आहे. दरम्यान, एक बैल पुरातून सुखरूप बाहेर पडला.
०००००००००००००००००
लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे प्रयत्न
रिसोड : तालुक्यात समता फाऊंडेशनकडून गेल्या तीन महिन्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आता जि.प.ने लसीकरण मोहिमेसाठी पुढाकार घेतला असून, या मोहिमेंतर्गत लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी पंचायत समितीचे सर्व विभाग सरसावले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी, कर्मचारी जनजागृती करीत आहेत.
०००००००००००००००००००००
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
रिसोड: गेल्या काही दिवसापासून तालुक्यात साथीचे आजार पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाने ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागात आठवडाभरात आरोग्य केंद्रांच्या वतीने ५०० हून अधिक ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.