चिखली परिसरात दमदार पाऊस
By Admin | Updated: July 10, 2014 22:44 IST2014-07-10T22:44:34+5:302014-07-10T22:44:34+5:30
रिसोड तालुक्यातील चिखली सरनाईक परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत.

चिखली परिसरात दमदार पाऊस
चिखली सरनाईक : रिसोड तालुक्यातील चिखली सरनाईक परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत. परिणामी, पावसाअभावी सुकणार्या बिजांकुराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांची चिंता अधिकच वाढली होती. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळायच्या. मात्र, पेरणी योग्य पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. जमिनीतील असलेल्या ओलीच्या भरवशावर काही शेतकर्यांनी पेरण्यास सुरुवात केली होती. पेरणी केलेले बियाणे उगवलेही आहे. मात्र, त्यानंतर पाऊस नसल्याने बिजांकूर कोमेजण्याच्या मार्गावर होते. दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. पावसाअभावी काही शेतकर्यांनी पेरण्या करण्याचे टाळले. काही शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत होते. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, गत दोन-तीन दिवसापासून बर्यापैकी पाऊस बरसल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. किनखेडा परिसरातील ८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकर्यांची चिंता तात्पुरत्या स्वरुपात का होईना, दूर झाली आहे.