आजारी आरोग्य केंद्रावर होणार ‘उपचार’
By Admin | Updated: November 16, 2014 01:35 IST2014-11-16T01:35:12+5:302014-11-16T01:35:12+5:30
इमारतीसाठी दोन कोटी २६ लाखाच्या अंदाजपत्रकास मंजुरात

आजारी आरोग्य केंद्रावर होणार ‘उपचार’
शिरपूरजैन (वाशिम) : मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आजारी असलेल्या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल दोन कोटी २६ लाख २७ हजार रूपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरात दिली आहे. शिरपूर व पंचक्रोशीतील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे; परंतु आजमितीला येथे अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे याचा फटका रुग्णांना सोसावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची सुमारे १५0 वर्ष जुनी असलेली इमारत सद्यस्थितीत जीर्ण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्ज इमारत उभी रहावी, यासाठी सन २00८ मध्ये तत्कालीन आरोग्य सभापती डॉ. श्याम गाभणे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एक ठराव मांडला होता.