हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल!
By Admin | Updated: September 12, 2016 02:56 IST2016-09-12T02:56:09+5:302016-09-12T02:56:09+5:30
वाशिम येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन.

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल!
वाशिम, दि. ११ : कापूस, सोयाबीन उत्पादकांसह सर्व शेतकर्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीतही युती शासनाला जाग येत नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वाशिम येथील जिजाऊ सभागृहात रविवारला पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, पक्ष निरीक्षक बसवराज पाटील, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली ठाकूर, युवा सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, श्याम देवळे, डॉ. भगवानराव गोटे, माधवराव अंभोरे, सुनील पाटील, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, माजी सभापती इम्रान कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खडसे, संदीप दहात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पटेल म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळामध्ये सोयाबीन, कापूस इत्यादी शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा मार्केटचे भाव जास्त असायचे. यामुळे शेतकर्यांचा आर्थिक स्तर सुधारला होता. युती शासनाच्या काळामध्ये हमी भावापेक्षा मार्केटच्या भावामध्ये प्रचंड घसरण झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांनी सर्व पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार शासनाला जागे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. वेगळ्या विदर्भाबद्दल पटेल म्हणाले, की जनतेचा पाठिंबा असल्यास वेगळ्या विदर्भाला आमचा मुळीच विरोध राहणार नाही.
वेगळ्या विदर्भामुळे जनतेचे हित होत असेल, तर नक्की आम्ही विदर्भावाद्यांच्या पाठीशी राहू.
दरम्यान, इतर मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटनेसाठी मतभेद विसरून काम करण्याचे आश्वासित केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी, तर आभार डॉ. भगवानराव गोटे यांनी केले. यावेळी सभागृहात हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.