वाशिम, दि. 5- शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात हरीद्वार येथील शिवमहिमा जागरण मंडळाचा कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. या मंडळाने धार्मिक कथांवर आधारित नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांनी ढोल, ताशे, कलापथकांसह विविध कार्यक्रम घेतले असतानाच नगराध्यक्ष अशोक हेडा आणि त्यांच्या परिवाराने गतवर्षीप्रमाणेच यंदाही हरीद्वार येथील शिवमहिमा जागरण मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या मंडळाने महा रासलिला, मयुर नृत्य, वृदांवनातील फुलांची होळी, शिवपार्वती नृत्य, तसेच महाकाली तांडव अशी विविध प्रकारची नृत्यं सादर करून सर्वांची मनं जिंकली. या मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो महिला, पुरुष भाविकांनी गर्दी केली होती.
विसर्जन मिरवणुकीत एकूण ३५ गणेश मंडळांचा सहभाग शहरात सकाळी ९ वाजेपासून ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर सर्वच मंडळांचे गणपती दुपारी २ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीत सामील झाले. शहरातील ३५ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. सकाळी ९ वाजता स्थानिक शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण आणि अभिवादन करून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार भावना गवळी, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, एसडीपीओ प्रियंका मिना, होम डीवायएसपी किरण धात्रक, नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, मुख्याधिकारी गणेश शेट्टे, वाशिमचे ठाणेदार विजय पाटकर, नगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उज्ज्वल देशमुख आदिंची उपस्थिती होती. यंदा विसर्जन मिरवणुक सोहळ्यात प्रथम स्थान मिळविण्याचा मान शिवशंकर गणेश मंडळाला मिळाला. या विसर्जन सोहळ्यात युवतींचा समावेश असलेल्या मंडळाने पारंपरिक भगवे फेटे बांधून सीनेगीतांसह भावगीतांवर सादर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधत होते. काही मंडळांनी लेझीम पथकांचा कार्यक्रमही ठेवला होता. संपूर्ण विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल, ताशांच्या गजर ऐकायला मिळाला.