खरीप हंगाम निम्म्यावर; अद्याप १८ हजार शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:59+5:302021-08-01T04:37:59+5:30

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता खरीप आणि रब्बी हंगाम मिळून १ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ११००००.०० कोटी रुपयांच्या ...

Half of the kharif season; 18,000 farmers are still waiting for crop loans | खरीप हंगाम निम्म्यावर; अद्याप १८ हजार शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत

खरीप हंगाम निम्म्यावर; अद्याप १८ हजार शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता खरीप आणि रब्बी हंगाम मिळून १ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ११००००.०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यात खरीप हंगामासाठी १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना १०२,५०० कोटी रुपयांचे, तर रब्बी हंगामासाठी ७ हजार ३०२ शेतकऱ्यांना ७५००.०० कोटी रुपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात खरीप हंगाम आता निम्म्यावर आला असतानाही केवळ ७१४ कोटी ६८ लाख रुपये ८६,८७९ शेतकऱ्यांना पीककर्जाचे वितरण करण्यात आले असून, २९ जुलैपर्यंत १७ हजार ९१२ शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पीककर्ज वितरणात सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील बँकांची उदासीनता असून, या क्षेत्रातील बँकांना ३२१०९ शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज वितरण करावयाचे असताना २९ जुलैपर्यंत केवळ १९४०० शेतकऱ्यांना १८३८८.८० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ५६.५८ टक्के आहे.

------

सहकारी बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

जिल्ह्यात सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी ६२ हजार ९१८ शेतकऱ्यांना ६०५००.०० पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५९८३९ शेतकऱ्यांना ४५२२०९.५४ कोटी रुपयांचे पीककर्ज या बँकेकडून वितरित करण्यात आले असून, हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ७४.७३ टक्के आहे. अर्थात दरवर्षी प्रमाणे यंदाही सहकार बँकेने पीककर्ज वितरणात आघाडी कायम ठेवली आहे.

----------

खासगी, सार्वजनिक बँकांना वावडे

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील १५ बँका मिळून ३२१०९ शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज वितरण करावयाचे असताना २९ जुलैपर्यंत केवळ १९४०० शेतकऱ्यांना १८३८८.८० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ५६.५८ टक्के आहे. अर्थात पीककर्ज वितरणाचे या बँकांना वावडे असल्याचे दिसते.

--------------------

खरिपासाठी शेतकऱ्यांनी केली उसणवार, खासगी कर्ज

कोट :

खरीप हंगामात बियाणे, खते व इतर खर्चासाठी बँकेकडे पीककर्जाची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली; परंतु दीड महिना उलटला तरी कर्ज मिळाले नाही. खरीप पेरणीची वेळ निघून जात असल्याने अखेर उसणवार करून पेरणी केली. आता फवारणी, निंदणासाठी पुन्हा पैशांची गरज असल्याने कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.

- घनशाम ढोक, शेतकरी

----------

कोट :

गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा पेरणीसह इतर खर्चासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे बँकेकडे पीककर्जाचा प्रस्ताव सादर केला; परंतु दोन महिने उलटत आले तरी, पीककर्ज मिळू शकले नाही. खासगी कर्ज काढून खरीप पेरणीसह इतर कामांचा खर्च भागवावा लागत आहे.

- अशोक थेर, शेतकरी

-----

खरीप पीककर्ज वितरणाची स्थिती

- निर्धारित उद्दिष्ट (रक्कम) - १०२५००.००

- निर्धारित उद्दिष्ट (शेतकरी) - १०४७९१

----------

प्रत्यक्ष वितरण

वितरित रक्कम - ७१४६७.९७

लाभार्थी शेतकरी - ८७८७९

-------------

प्रतीक्षेतील शेतकरी - १७९१२

अपेक्षित पीककर्ज रक्कम - ३१०३२.०३

Web Title: Half of the kharif season; 18,000 farmers are still waiting for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.